येरमनार ग्रामपंचायत मधील प्रताप
पेरमिली : येथून सहा किलोमीटर अंतरावर ग्राम पंचायत येरमनार आहे. या ग्रामपंचायतीने सहा महिन्यापूर्वी दीड लाखाचा इ रिक्षा खरेदी केला. खरे तर हा इ रिक्षा खरेदी करण्याची गरज नव्हती. या ग्रामपंचायत अंतर्गत येणारी सर्व गावे ग्रामीण भागातील असल्याने गावकरी कचऱ्याची विल्हेवाट स्वतःच लावतात. गावात घाण जवळपास नसते. अशा स्थितीमध्ये ई रिक्षा खरेदी करण्याची गरज काय होती असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. इ रिक्षा तर खरेदी केला मग त्याचा वापर होत नसल्याने दीड लाखाचा भुर्दंड कोण भरून देईल ? असा प्रश्न आता गावकरी विचारत आहे.
खरेदी करण्यात आलेला ई रिक्षा गावातील प्रतिष्ठित नागरिक व किराणा दुकानदार कोंडागुर्ले यांच्या घरी आणून ठेवण्यात आला आहे. इलेक्ट्रिकवर चार्जिंग होणारा हा ई रिक्षा आहे. इ रिक्षा आणला तेव्हापासून बंद अवस्थेत असल्यामुळे या ई रिक्षाची बॅटरी खराब झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत कडून ई रिक्षा खरेदी करण्यात आला असला तरी एकही दिवस ई रिक्षा येरमणार ग्रामपंचायत मध्ये येत असलेल्या गावात फिरवण्यात आली नाही. गावात कचरा नसल्याने व ग्रामपंचायती येरमणार अंतर्गत येत असलेली गावे कचऱ्याची विल्हेवाट स्वतःच लावत असल्याने ही रिक्षा फिरवून काय कामाची या हेतूने ही रिक्षा फिरवण्यात येत नसली तरी दीड लाखाचा खर्च आता कोण भरून देईल हा विषय येथे उपस्थित झाला आहे. हेच दीड लाख रुपये ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या शाळांच्या सुशोभीकरणावर लावले असते तर किमान स्थानिक आदिवासी व गैर आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक प्रगती योगदान दिल्यासारखे झाले असते पण बिनकामाचा ई रिक्षा खरेदी करून ग्रामपंचायतने काय साध्य केले हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

