अहेरी : एक वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर खा. नामदेव किरसान अहेरी विधानसभा मतदारसंघात येण्याची कुणकुण लागली आहे. 2024 ला 18 व्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीला तब्बल एक वर्षाचा काळ लोटला. एका वर्षानंतर खा. नामदेव किरसान अहेरी विधानसभा मतदारसंघात येणार असल्याची माहिती आहे. खा. नामदेव किरसान 18 व्या लोकसभेत चिमूर-गडचिरोली या अनु. जमातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. लोकसभेमध्ये प्रामुख्याने केंद्र शासनाशी संबंधित प्रश्नांचा उहापोह केल्या जातो. स्थानिक परिसरात केंद्र शासनाशी संबंधित अनेक विषय आहेत. 353 सी साकोली-सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचा मुद्दा आहे. समाज माध्यम आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून या महामार्गाच्या समस्येशी आपण चांगले अवगत आहात. जनता या महामार्गाने रोज जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहे. अहेरी विधानसभा मतदारसंघात आपण येत आहात अशी माहिती आहे. लगाम-आल्लापल्ली-सिरोंचा असा प्रवास आपण एक दिवस दुचाकीने करा. जनता रोज करते. आपण एक दिवस करा. या महामार्गावर आपण दुचाकीने प्रवास केला तरच या महामार्गाची प्रचिती आपणास येईल.
राज्यमार्ग असलेल्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. दहा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. कामाची प्रगती शून्य आहे. सुरजागड येथून कच्च्या लोखनीजाची वाहतूक होत असल्याने आल्लापल्ली-लगाम-आष्टी हा मार्ग पूर्णपणे कामातून गेला आहे. एक वर्षापूर्वी कसेबसे लगाम पर्यंत काम करण्यात आले. वर्ष संपले पण वन उपज तपासणी नाका लगाम पासून आलापल्लीपर्यंत कामाची प्रगती नाही. आलापल्ली पासून सिरोंचा पर्यंत चालढकल पद्धतीने काम सुरू आहे. कंत्राटदार आपल्या मर्जीने काम करतो तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी कंत्राटदाराचे कमिशन एजंट झाले आहेत. दहा वर्षांपूर्वीचाच रस्ता चांगला होता. अशी प्रतिक्रिया जनता व्यक्त करीत आहे. त्रास देणारे राष्ट्रीय महामार्ग आम्हाला नको. काम करणे जमत नसेल तर केंद्र सरकारने हे काम सोडून द्यावे अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. आपण केंद्र सरकारचे प्रतिनिधी आहात. केंद्रात स्थानिक जनतेच्या समस्या मांडता. मग या समस्येवर अंतिम तोडगा काढण्यासाठी आपल्याला लगाम-आलापल्ली-सिरोंचा असा दुचाकीने दौरा करणे अत्यावश्यक आहे. तेव्हाच आपल्याला जनतेच्या मनातील भावना समजू शकते.
लोकसभेच्या निवडणुकीत विद्यमान केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी गडचिरोली येथे आले असता त्यांनी वनविभागाच्या डोक्यावर खापर फोडले होते. ‘झारीतील शुक्राचार्य’ अशी उपमा वनविभागाला दिली होती. हा प्रकार समजण्याच्या पलीकडचा आहे. मागील राज्य सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होते. राज्य सरकार भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे होते. विरोधी पक्षाचे नव्हते. सरकार आपल्याच पक्षाचे असताना वनविभागाला आपण नमवू शकत नाही. वनविभाग आपल्याला ऐकत नाही ही बाब समजण्यापलीकडची आहे.
आपणही हीच ‘री’ ओढण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांनी ओढली तुम्ही तर विरोधक आहात. मागे राहण्याची शक्यता नाही. केंद्रात आणि राज्यात आपले सरकार सत्तेवर नाही. सरकार आपले ऐकत नाही असा आकांत आपण करू शकता. पण हा उपाय नाही. निधी मंजूर आहे. वनविभागने रस्त्याची परवानगी दिली आहे. तोडण्यात आलेल्या झाडाची रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने वनविभागाकडे भरली आहे. सगळ्या गोष्टी ‘क्लियर’ झाल्या असताना राष्ट्रीय महामार्गाचे काम ‘दिन मे ढाई कोस’ कसे आहे. हे तुम्हाला शोधणे गरजेचे आहे. गडकरींनी आपल्याच सरकारला झारीतील शुक्राचार्य अशी उपमा दिली होती. विरोधक असल्याने तुम्ही सहज देऊ शकता. द्यायची की नाही हे तुम्ही ठरवायचे आहे. पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला कामाला लावायचे आहे.
खरे तर या विभागाचे संबंधित मंत्री नितीन गडकरी विदर्भाचे आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा त्यांना दांडगा अभ्यास आहे. आपण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी ची समस्या आतापर्यंत नितीन गडकरींपर्यंत कितीदा मांडली हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मांडली असेल तर त्याचे पुरावे जनतेपुढे सादर करा. नसेल मांडली तर आता मांडा. पण लगाम- सिरोंचा हा दौरा दुचाकीने करा. तेव्हाच या रस्त्याचे वास्तव तुम्हाला कळेल. वातानुकूलित वाहनात बसून झटक्यांचा अनुभव न घेता रस्त्याने फिरणे सहज शक्य आहे. पण या रस्त्यावर फिरणारी 99% जनता सर्वसामान्य आहे दुचाकी, बस सारख्या वाहणांचा वापर करते. त्यांना होणारा त्रास तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायचा असेल तर दुचाकी वरचा प्रवास हाच सर्वोत्तम प्रवास आहे.
खरे तर तुम्हाला या मतदारसंघात यायला बराच उशीर झाला आहे. 365 दिवसात दोन दिवस तुम्हाला या मतदारसंघाचा दौरा करण्यासाठी मिळाले नाहीत. अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघाने आपल्याला प्रचंड मताधिक्य दिले होते. आपण या मतदारसंघात टप्प्याटप्प्याने महिनाभर तरी मुक्काम करणे अपेक्षित होते. कामाच्या धकाधकीत आणि व्यापात आपण या मतदारसंघात येऊ शकले नाही असे आपले मत असले तरी ते आम्हाला मान्य नाही. आपण 365 दिवसाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अहेरी मतदारसंघात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. स्वागत आहे. किमान तीन ते चार दिवसाचा दौरा अपेक्षित आहे. कुठे फिरता हा आपला प्रश्न आहे. किती वेळ देता हा आपला प्रश्न आहे. पण सुस्तावलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला आणि कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदारांना वठणीवर आणा एवढेच. यासाठी दुचाकीनेच फिरणे आवश्यक आहे.

