आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन
आलापल्ली येथे खरीप हंगाम पूर्व बैठक
अहेरी- शेतकऱ्यांनी रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताचा अधिक वापर करून शेतात उत्पादन घ्यावे असे प्रतिपादन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते शनिवार 24 मे रोजी अहेरी नजीकच्या आलापल्ली येथे वनविभागाच्या वनसंपदा सभागृहात तालुका स्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक व कार्यशाळेत अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी आमदार धर्मराव बाबा आत्राम होते तर मंचावर प्रामुख्याने उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजीवार, जिल्हा कृषी समन्वयक डॉ. किशोर झाडे, ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज भाई शेख, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, सुरेंद्र अलोणे, इरफान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतावर भर देऊन धान, कापूस, मका, मिरची पिकासोबतच काजू, स्ट्रॉबेरी, नारळ, पिके आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी जोडधंदा म्हणून शेततळे तयार करून मत्स्यव्यवसाय तसेच बांबू लागवडही करावे असे म्हणत मोलाचे मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी अहेरी उपविभागातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा या पाचही तालुक्यातील कृषी सबंधी माहिती अवगत करून व आढावा घेऊन कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य व मदत करून शेतातील उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी आणि सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश दिले.
आढावा बैठकीचे प्रास्ताविक आनंद गंजीवार यांनी तर सूत्रसंचालन भूषण गोव्हाळे यांनी केले. उपस्थितांचे आभार चेतन पानबुडे यांनी मानले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी सेवक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

