प्रतिनिधी
अहेरी : दिनांक 16 मार्च 2025 ला जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक झाली. निवडणुकीच्या अनुषंगाने पतसंस्था चर्चेत आली. निवडणुकीच्या मैदानात दोन्ही पॅनलने आरोप-प्रत्यारोप करीत विविध मुद्दे चर्चेत आणले. यात एक मुद्दा बाजूला राहिला. 20 करोडची वार्षिक उलाढाल असलेल्या पतसंस्थेमध्ये काही सभासदांकडे तब्बल 2 करोडची रक्कम थकीत असल्याची बाब पुढे आली आहे.
थकीत असलेली दोन करोडची रक्कम सामान्य नाही. रक्कम थकीत असणे किंवा बुडणे या कारणामुळे आतापर्यंत अनेक पतसंस्था डबघाईस आल्या आहेत. ही बाब जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरी बाबतीत झाली नसली तरी दोन करोडची रक्कम थकीत कशी काय आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
2 करोडची रक्कम थकीत असण्यासाठी जबाबदार कोण हे सुद्धा शोधणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरी ही सामान्य नागरिकांची पतसंस्था नाही. सामान्य नागरिकांच्या पतसंस्थेमध्ये कर्ज घेतल्या जाते. कर्ज भरले नाही तर न्यायालयीन केसेस दाखल कराव्या लागतात. जप्तीची कारवाई करावी लागते. जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीचे सभासद पूर्णपणे शासकीय नोकरीवर आहेत. पतसंस्थेची कर्ज रक्कम वेतनातून कपात करण्याचे अभिवचन एका फॉर्मद्वारे पतसंस्थेला गेल्या आहे.. तरीपण रक्कम थकीत आहे. दोन करोडची कर्ज रक्कम थकीत असण्यामागच्या कारणांचा शोध घेतला असता पंचायत समितीच्या माध्यमातून शिक्षकांचे वेतन होत असते. वेतन होताना विविध कपातीमध्ये पतसंस्था कर्जाची रक्कम सुद्धा कपात होते. काही सभासद कर्ज तर उचलतात. पण देण्यास मागेपुढे पाहतात. पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून सभासदांचे वेतन तयार होत असते. ज्यांना कर्ज रक्कम थकवायची असते ते सभासद वेतन तयार करणारे लिपिकाशी ‘संधान’ साधतात. लिपिकाला चिरीमिरी देतात. लिपिक कपातीमध्ये पतसंस्थेच्या रकमेचा उल्लेखच करत नाही. पतसंस्थेला कर्जाची रक्कम प्राप्त होत नाही. रक्कम थकीत झाली असल्याचे सांगण्यात येते.
रक्कम न देण्यासाठी काही सभासदांकडून हा उपाय शोधण्यात आला असला तरी यात मात्र पतसंस्थेचे नुकसान होत आहे एवढे नक्की. दोन करोडची रक्कम कोणत्या कालावधीपासून थकीत आहे.याचा शोध घेऊन सदर कालावधीत रक्कम का कपात करण्यात आली नाही.याचा पाठपुरावा पतसंस्थेच्या नवीन संचालकांना पंचायत समितीशी करावा लागणार आहे. शिक्षकांच्या वेतनातून रक्कम कपात करण्यात आली नसेल तर त्या लिपिकावर कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे करावी लागणार आहे. 31 मार्च 2025 पर्यंत दोन करोड थकीत राहिले पतसंस्थेचा कारभार याच पद्धतीने सुरू असला तर भविष्यात ही रक्कम अडीच-तीन करोड वर पोहोचण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
या संदर्भात नवीन संचालक मंडळाचे सदस्य लक्ष्मण गद्येवार यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी ही बाब कबूल केली. एकूण दोन करोडची रक्कम काही सभासदांकडे थकीत असल्याचे सांगितले. थकीत असलेली रक्कम शिक्षकांचीच आहे थकित असल्या मागच्या कारणांचा शोध घेतल्या जाईल प्रसंगी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन दोषी वेतन कपात यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत दोन करोडची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न आम्ही करू असे ते म्हणाले.
दोन करोडची रक्कम पतसंस्थेच्या आर्थिक फायद्याच्या हिशोबाने महत्त्वपूर्ण आहे. सभासदांना मिळणारा लाभांश अशा रकमेमुळे प्रभावित होतो. लाभाच्या योजना सुद्धा प्रभावीत होतात. 1986 ला स्व. मनोहरराव जंगावार यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली पतसंस्था आज सुस्थितीत असली तरी प्रगतीच्या मोठ्या शिखरावर आहे असे म्हणता येत नाही. चामोर्शी, आरमोरी येथील पतसंस्था चांगली आहे. असा गुणगौरव स्थानिक पंचायत समितीचे शिक्षक करतात. यामुळे जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरी कुठेतरी मागे पडत आहे. कुठेतरी पतसंस्था सभासद नाराज आहेत. याविषयी सकारात्मक राहून पतसंस्थेच्या अडचणी शोधणे आणि त्या सोडविणे महत्त्वाचे ठरते.

