निलेश विश्रोजवार यांचा आक्षेप मान्य
अहेरी : जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरी ची निवडणूक रंगात येत आहे. होळीच्या आधीच या निवडणुकीत स्पर्धेचा रंग भरल्या जात आहे. जुन्या-नवीन चुका शोधून निवडणुकीच्या मैदानात असलेल्या उमेदवारांना कसे बाद केले जाईल हा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. असा प्रकार अशोक दहागावकर यांच्या संदर्भात झाला. सोसायटी बचाओ पॅनलचे उमेदवार निलेश विश्रोजवार यांनी अशोक दहागावकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. जिल्हा निबंधकांनी आक्षेप मान्य केला. आणि अशोक दहागावकर यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 73 अ अंतर्गत अशोक दहागावकर यांचा अर्ज रद्द करण्यात आला. निलेश विश्रोजवार यांच्या अर्जावर 3 मार्च 2025 ला जिल्हा निबंधकांकडे सुनावणी झाली. या सुनावणीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. आणि अर्ज रद्द करण्यात येत असल्याचा निकाल जिल्हा निबंधकांनी दिला.
जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीचे सर्वात जुने सदस्य म्हणून अशोक दहागावकर यांची ओळख आहे. 2006 ते 2011 या कार्यकाळात ते या पतसंस्थेचे अध्यक्ष होते. 2011 ते 2016 या कार्यकाळात संचालक होते. 2016 पासून आतापर्यंत नऊ वर्ष ‘अनोखा’ कार्यकाळ लाभलेल्या संचालक मंडळात सुद्धा ते सदस्य म्हणून कार्यरत होते.
विद्यमान संचालक टारझन बळवंत सुरजागडे यांनी अशोक दहागावकर यांच्यावर आक्षेप नोंदविला होता. अशोक दहागावकर यांचे संस्थेचे सदस्यत्व संपवण्यात यावे यासाठी त्यांनी हा आक्षेप नोंदविला होता. 2006 ते 2011 या कार्यकाळात अशोक दहागावकर हे पतसंस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात संस्थेमध्ये अपहार केला. यामुळे संस्थेचे सामान्य सभासद ते राहू शकत नाहीत. असा आक्षेप त्यांनी जिल्हा निबंधकाकडे नोंदविला होता. यावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केल्या गेला. टारझन बळवंत सूरजागडे यांचा युक्तिवाद जिल्हा निबंधक यांनी अमान्य ठरविला. सुरजगाडे यांचा आक्षेप अर्ज फेटाळला.अशोक दहागावकर यांचे सदस्यत्व कायम ठेवले.
सुरजागडे यांनी सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित केला. अन्य संचालक निलेश विश्रोजवार यांनी उमेदवारी अर्ज रद्द करण्यासंदर्भात जिल्हा निवडणुकांकडे आक्षेप नोंदविला होता. यावरही सुनावणी झाली. निलेश विश्रोजवार यांचा आक्षेप जिल्हा निबंधकांनी मान्य केला. अशोक दहागावकर हे पतसंस्थेच्या या निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात होते. निलेश विश्रोजवार यांचा आक्षेप मान्य झाल्याने अशोक दहागावकर यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला. ते निवडणूकितून आपोआपच बाद झाले आहेत.
2006 ते 2025 असा तब्बल 19 वर्षाचा कार्यकाळ लाभलेले अशोक दहागावकर हे पतसंस्थेच्या वर्तुळातील अनुभवी सभासद म्हणून ओळखले जातात. सलग तीन पंचवार्षिक निवडणुका आणि ‘अनोख्या’ पद्धतीने मिळालेला चार वर्षाचा अधिकचा कार्यकाळ, पुन्हा या निवडणुकीत उभी राहण्याची इच्छा यावर निलेश विश्रोजगार यांनी पूर्णविराम दिला.

