प्रतिनिधी
अहेरी : प्रचंड वादविवाद आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्यानंतर अखेर अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा काल राजीनामा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांकडे दिलेला राजीनामा राज्यपालांकडे गेला. मंजूरही झाला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले मंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार च्या वाट्यातील आहे. रिक्त झालेल्या या पदासाठी अनेकांनी दावा केला असला तरी अहेरी विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य व माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दावा सुद्धा महत्त्वपूर्ण समजल्या जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा सदस्यांमध्ये धर्मरावबाबा आत्राम यांचे स्थान महत्वपूर्ण आहे. विविध विभागाचा त्यांना मोठा अनुभव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जडणघडणीत त्यांचे महत्त्वाचे योगदान असल्याने त्यांना मंत्रिपद देण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातून होत आहे.
मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचे नाव आले. त्यांना अटक झाली. वाल्मीक कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. या विषयावरून गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण राज्यात हा विषय चर्चेचा झाला आहे. मित्र पक्षातील आमदार सुरेश धस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी या विषयावर सरकारला धारेवर धरले आहे. त्याचा परिणाम म्हणून अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला.
राज्यात तीन राजकीय पक्षांचे सरकार सत्तेवर आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी तीन राजकीय पक्षांची युती आहे. धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित आहे. त्यांच्या राजीनामामुळे अजित पवार गटाच्या वाट्यातील एक पद रिक्त झाले आहे. रिक्त झालेले पद येत्या काही कालावधीत भरले जाणार आहे. हे पद विदर्भाच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता आहे. यात अनुभवी विधानसभा सदस्य म्हणून धर्मरावबाबांच्या नावाची चर्चा सगळीकडे आहे. जिल्ह्याच्या आणि विदर्भाच्या राजकारणात राजकीय जाणकारांकडून आणि विविध राजकीय पक्षाकडून व स्थानिक जनतेकडून सुद्धा चर्चेला सुरुवात झाली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर धर्मरावबाबा आत्राम यांच्या समर्थकांनी मुंबई दरबारी ही मागणी लावून धरली आहे. रिक्त झालेल्या पदावर पुन्हा एकदा धर्मरावबाबांची वर्णी लावावी या विषयावर जिल्ह्याचे राजकारण तापणार आहे.
