सिरोंचा : आल्लापल्ली-सिरोंचा रस्ता प्रचंड खराब आहे. या रस्त्यावर भंगार बस पाठवण्याचा प्रकार राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराकडून होत आहे. पाठवण्यात येणाऱ्या बसेस या रस्त्यावर नेहमीच खराब होतात. याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. आज दुपारी दोनच्या दरम्यान सिरोंचा-अहेरी या बसचे पुढील चाक पंचर झाले. टायरचे रिमोल्ड निघाले. तब्बल दोन तास प्रवाशांना ताटकळत राहावे लागले. सदर बस मध्ये चाक लावण्याचे साहित्य सुद्धा नव्हते. मागून येत असलेल्या बस मधून चाक लावण्याचे साहित्य मागितले आणि चाक लावले. पुढील प्रवासासाठी बस निघाली.
सिरोंचा येथून 11:30 च्या दरम्यान सुटणारी सिरोंचा-अहेरी ही बस अहेरी च्या प्रवासाकरिता निघाली असता पोलीस स्टेशन बामणीच्या समोर पुढच्या चाकाचे रिमोल्ड निघाले. बस पंचर झाली. बस मध्ये टॉमी हे चाक लावण्याचे सामान नव्हते. यानंतर दुपारी टेकड्याकडे जाणारी बस आली.त्यातून साहित्य मागविण्यात आले. चाक दुरुस्त करण्यात आले. अहेरीच्या प्रवासाकरिता ही बस निघाली. यात प्रवाशांचे तब्बल दोन तास वाया गेले. उन्हातान्हात प्रवासी ताटकळत होते.
उन्हाचा हंगाम सुरू होत आहे. हवामान विभाग उन्हाबाबत रेड अलर्ट, एलो अलर्ट देत आहे. अशा स्थितीमध्ये बसेस पंचर झाल्या तर प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे.
