अहेरी : दिनांक 4 मार्च 2025 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती. 5 मार्च 2025 ला उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार होते. आज सकाळी 11 वाजता सहा.दुय्यम निबंधक अहेरीच्या कार्यालयामध्ये निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. दोन्ही पॅनलने सामंजस्याने चिन्ह स्वीकारली.
तब्बल 9 वर्षांचा अनोखा कार्यकाळ लोटल्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत दोनच पॅनल तयार झाले आहेत. आणि फक्त एक उमेदवार वैयक्तिकरित्या निवडणूक लढवीत आहे. समविचारी शिक्षकांनी एकत्रित येऊन दोन पॅनल तयार केले. यातील एक पॅनल समता पॅनल आहे. यात प्रामुख्याने वनिता कन्नाके, किशोर सुनतकर, दिवाकर मादेशी, श्रीकांत काटेलवार, उमेश चिलवेलवार व इतरांचा समावेश आहे. समता पॅनलचे बहुतेक उमेदवार सकाळी 11 वाजता सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात आले. सहाय्यक दुय्यम निबंधक लोमेश रंधये यांनी निवडणूक आयोगाकडून शिफारस केलेले चिन्ह दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना दाखविली. उमेदवारांना वेगवेगळी चिन्ह घेता येतात किंवा सामंजस्याने पॅनल मधील सगळ्या उमेदवारांना एकच चिन्ह घेता येते. समता पॅनलच्या उमेदवारांनी छत्री चिन्हावर शिक्कामोर्तब केले. चिन्ह
किंवा निवडणूक निशाणी मिळाल्यानंतर उमेदवार अधिकृतपणे आपल्या प्रचारास मोकळे होत असतात. पतसंस्थेचे मतदार सुजाण असल्याने चिन्हाशी फारसा संबंध ठेवत नसेल तरी निवडणूक प्रक्रियेत चिन्हाला मोठे महत्त्व आहे. प्रचारात चिन्हांच्या माध्यमातून आकर्षकता सुद्धा निर्माण होते. चिन्हांचा योग्य वापर करून आकर्षक आणि प्रभावी प्रचार सुद्धा करता येतो.
छत्री हे निवडणूक चिन्ह मिळताच समता पॅनल कडून जल्लोष करण्यात आला. छत्रीच्या माध्यमातून प्रत्येक मतदारांपर्यंत जाण्याचा मानस असल्याचे अनेक उमेदवारांनी बोलून दाखवले.
