सकाळी प्रादेशिक वर्तमानपत्र हातात घेतलं. पाने चाळायला लागलो. दोन बातम्या वाचण्यात आल्या. एक बातमी वाचून मन बरं वाटलं. दुसरी बातमी वाचून पायाखालची वाळू सरकली. वाईट वाटलं. विषय जातीचा होता.एकाने जात संपवण्याची भाषा केली. दुसऱ्याने जातीच्या नावावर दर्शन घेण्यास मज्जाव केला. ‘जी जात नाही’ तिला जात म्हणतात या शब्दाची आठवण झाली. 21व्या शतकात अजूनही जातीला महत्त्व दिले जाते. भेदाभेदाची उतरण्ड कायम आहे. पुरोगामी विचारसरणीच्या लोकांकडून जात नष्ट करण्याचे प्रयत्न केले जात असले तरी याला फारसे यश मिळाले नाही. कालच्या उदाहरणावरून दिसून आले. महाराष्ट्र संत महात्म्यांचे राज्य आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जगनाडे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज इत्यादींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राज्याला अजूनही जातीची कीड लागली आहे. कधी जाईल माहित नाही. 21व्या शतकात आहोत. देशाने प्रगतीचे अनेक पल्ले गाठले आहेत. भारताची सुनीता विल्यम्स नऊ महिने अंतराळात वास्तव्य करून आली. भारताचा झेंडा चहुबाजूने रोवला. आम्ही मात्र जातीचे विषय घेऊन बसलो. दर्शन घेतानाही जात आडवी येते. उच्च-नीच असा भेदाभेद आम्हाला अजूनही मान्य आहे. कधी आमची विचारसरणी बदलेल माहित नाही. पण वातावरण मात्र ढवळून निघते. विचार करायला लावते. भारतीय जनता पक्षाचा काल 44 वा स्थापना दिवस होता. 1980 ला भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाली. स्थापना दिवस नागपूरला उत्साहात साजरा झाला. केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची स्थापना दिवसाला उपस्थिती होती. कार्यक्रमात त्यांनी आपले परखड विचार मांडले. भाजपचा प्रदेशाध्यक्ष असताना अनेक वरिष्ठांच्या सल्ल्याला न मानता मी विविध जातीचे सेल उघडले होते. सर्व जातींना पक्षासोबत जोडणे हाच त्यामागील उद्देश होता. जाती जुळल्याच नाही. ती मोठी चूक ठरली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ती चूक करू नये. मनपा निवडणुकीदरम्यान विविध जातींच्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पत्रे येतील.तेव्हा बावनकुळेंना माझ्या बोलण्याची गंभीरता लक्षात येईल. भाजप हीच आपली जात आहे. हे सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे असा जातविरहित सल्ला नितीन गडकरींनी दिला. परखड विचार आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून भारतीय राजकारणाचे संदर्भ बदलले आहेत. ग्रामपंचायत पासून तर संसदेपर्यंत तिकिटाचे वाटप करताना जातीला प्राधान्य देण्यात येते. वस्तुस्थिती आहे. वर्धा, चंद्रपूर, लोकसभा मतदारसंघात विशिष्ट जातीचाच उमेदवार उभा केला जातो. येथे सर्वच राजकीय पक्ष जातीचा प्रयोग करतात. कुणीच धुतल्या तांदळासारखे नाही. काँग्रेस असो व भाजप. हे अनेक वर्षापासून दिसते. मतदारसुद्धा जातीच्या संदर्भानुसारच मतदान करतात. येथे दिग्गज उमेदवार जातीमुळे आपटले आहेत. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांचे विचार निश्चितच महत्त्वपूर्ण आहेत. विचार जातीचा नव्हे तर, कामाचा व्हायला पाहिजे. समाजात आज अनेक ठिकाणी आंतरजातीय विवाह होतात.मुलांच्या इच्छेखातर आंतरजातीय विवाहाला मान्यता देण्याची समाजाची मानसिकता झाली आहे. विरोध होत नाही. निवडणुका लढवितांना जातीचे आधारावरच तिकीट दिल्या जाते. सून चालते, जावई चालतो. पण उमेदवार मात्र चालत नाही. दुर्दैव आहे भारतीय राजकारणाचं. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी केलेले विधान सुचक आहे. नितीन गडकरी यांच्या परखड विचाराची दखल घेत भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इतर पक्षांनी कामाला सुरुवात केली तर निश्चितच राजकारणाचे संदर्भ बदलायला वेळ लागणार नाही. असे झाले तर राजकारणातून गुन्हेगारांचे प्रमाण सुद्धा कमी होईल. निवडणुकीत जिंकून आलेल्या उमेदवारांवर डझनभर गुन्हे दाखल असतात. तरी ते जिंकून येतात. कार्यकर्ता, सामान्य माणूस, कामाचा माणूस उभा राहतो. हरतो. गुन्हेगार जिंकून येण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत असले तरी त्यातले जात हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कारण आहे. निवडणूकितून जात हद्दपार व्हायला पाहिजे. तिकीट देताना पक्षाने सुद्धा व्यक्तीचा विचार करावा. जातीचा विचार करू नये. यश आणि अपयश येतच राहील. जात विरहित कामाची सुरुवात राजकीय पक्षांमध्ये व्हायला पाहिजे. असे झाले तर भारताची राजकारण प्रगल्भतेच्या दिशेने गेलेले असेल. नितीन गडकरी यांच्या विचारांचे अभिनंदन आहे.
दुसरी बातमी दर्शनासाठी मज्जाव केल्याची वाचली. जानवे आणि सोवळे नसल्याने माजी खासदार रामदास तडस यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यापासून मज्जाव करण्यात आला. माजी खासदार संदर्भात घडलेली ही घटना आहे. सामान्य माणूस व अस्पृश्य म्हणून जन्मास आलेल्या व्यक्तीचे काय हाल असतील. कल्पना करविता येत नाही. 21 वे शतक आहे. सुनीता विल्यम्स अंतराळात जाऊन आली. आम्ही दर्शन घेताना ‘जात’ लक्षात घेतो. दुर्दैव आहे. देवळी जिल्हा वर्धा येथील हा प्रकार आहे. भारतीयाचे श्रद्धास्थान प्रभू श्रीराम यांची काल जयंती होती. प्रभू श्रीरामांची जयंती रामनवमी म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. इतर मागासवर्गीय समाजामध्ये जन्म घेऊन लोकसभेमध्ये दोनदा वर्धा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे रामदास तडस देवळी येथील राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले असता जानवे आणि सोवळे आडवे आले. प्रा. मुकुंद चौरीकर नावाच्या एका उच्चशिक्षित मंदिर ट्रस्टीने त्यांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास मज्जाव केला. बाहेरच थांबविले. रामदास तडसांनी बाहेरूनच प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. माजी खासदाराचे असे हाल असतील तर सामान्य माणसाला गाभाऱ्यात जाऊन दर्शन मिळत असेल काय. यावर प्रत्येकाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याचा ठेका फक्त जानवे आणि सोवळे करणाऱ्यांनाच मिळाला नाही. प्रत्येकांचा तो अधिकार आहे. जातीच्या नावावर दर्शन घेण्यास नकार देण्यात येत असेल तर तो भारतीय संविधानाप्रमाणे गुन्हा आहे. या ट्रस्टीवर गुन्हे दाखल करण्यासाठी पुरोगामी विचारांच्या लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. देवळी येथे घडलेला हा प्रकार दुर्दैवी आहे. ज्या मंदिर ट्रस्टींनी माजी खासदारासारख्या व्यक्तीला दर्शन घेण्यापासून अडवले त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. घटनेची दखल केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली पाहिजे. प्रश्न जातीचा नाही प्रश्न विचाराचा आहे. आम्हाला जात नष्ट करायची आहे ती फक्त राजकारणातूनच नाही तर प्रत्येक क्षेत्रातून जात नष्ट झाली पाहिजे. 70-80 वर्षांपूर्वी भारतात एक वेगळी परिस्थिती होती. शिक्षणाचे प्रमाण कमी होते . शिक्षण नसल्यामुळे जागरूकता नव्हती. प्रसारमाध्यमे नव्हती. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विचार पोहोचत नव्हते. आज सगळे संदर्भ बदललेले आहेत.एका सेकंदात बातम्या सर्वत्र पोहोचतात. तरीही आम्ही मात्र स्पृश्य, अस्पृश्यता पाळतो. सोवळे आणि जानव्याच्या नावावर व्यक्तीचा अधिकार हिरावून घेतो. यावर सुद्धा प्रत्येक राजकीय पक्षांनी मतपेटीचा विचार न करता मोठ्या प्रमाणात विचार मंथन करणे गरजेचे आहे. विषय एक आहे. एकाच दिवशी दोन घटना घडलेल्या आहेत. बाजू दोन आहेत. एक विचार नागपुरात मांडल्या गेला.तर दुसरा प्रकार वर्धेत घडला.

