अहेरी : भारत देशाला पाच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. विद्यमान परिस्थितीत पाकिस्तानात असलेले मोहेंजोदडो आणि हडप्पा हे भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचे मूर्तीमंत उदाहरण आहे. येथील पाच हजार वर्षांपूर्वीची सिंधू संस्कृती अजूनही जगाचे लक्ष वेधून घेत आहे. भारतात वेगवेगळ्या संस्कृती अस्तित्वात आल्या आणि काळाच्या ओघात नष्टही झाल्या. संस्कृती विकसित आणि परिपक्व भारताची साक्ष देत आहे. या संस्कृती कडे लक्ष टाकले तर 5000 वर्षांपूर्वीच्या परिपक्व भारताबद्दल गर्व वाटतो.
या संस्कृतीचे अवशेष संपूर्ण भारतभर विखुरले आहेत. कुठे ना कुठे ते सापडत असतात. सापडलेल्या अवशेषावरूनच पुरातत्व विभाग काळाचा शोध घेत असतो. दोन महिन्यापूर्वी अहेरी नजीक वाहणाऱ्या प्राणहीता नदीच्या पात्रात सुंदर शिल्प मासेमारी करणाऱ्यांना मिळाले. त्यांनी ते नदीपात्रात आणून ठेवले. धार्मिक भावनेतून लोकांनी पूजाअर्चा सुरू केली. काहींनी संशोधनाच्या भावनेतून या शिल्पाचा काळ उलगडल्या जावा यासाठी शासनाकडे निवेदन सादर केले. पण यावर कोणतीही कारवाई झाली नाही आणि आतापर्यंत शिल्प दुर्लक्षितच आहे.
दोन महिन्यांपूर्वीची ही घटना आहे. नदीच्या पाण्यात मासेमारी करताना मासेमारांना मूर्ती सदृश्य दगड आढळला. दगडावर वेगवेगळे शिल्प कोरले असल्याने त्यांनी पाण्यातून हा दगड बाहेर काढत नदीपात्रात असलेल्या वाळूत आणून ठेवला. भाविक भक्तांनी मूर्तीची पूजा करणे सुरू केले. तर काहींनी मूर्ती कडे बारकाईने लक्ष घालित मूर्तीवर संशोधन व्हावे या अनुषंगाने शासनाकडे मागणी केली. मूर्तीवर संशोधन झाल्यास मूर्तीचा काळ निश्चित होऊ शकतो. पुलाच्या खाली सापडलेली ही मूर्ती नेमकी येथे कशी आली याचा शोध लागू शकतो. मूर्ती मिळण्याचे ठिकाण आणि हेमांड पंथी देवालय मार्कंडा याचे अंतर शंभर किलोमीटरच्या जवळपास आहे. या मूर्तीचा आणि मार्कंडाचा काही संबंध आहे का हे सुद्धा पुरातत्व विभाग स्पष्ट करू शकते. या परिसरात पुन्हा अशी काही शिल्पे आहेत का त्याचा शोध पुरातत्व विभाग घेऊ शकते. अशी शिल्पे आढळल्यास अहेरीचे नाव पुरातत्व विभागाच्या नकाशावर कोरल्या जाऊ शकते ही भूमिका संशोधनाचा दावा करणाऱ्यांची आहे.
महाशिवरात्रीच्या पर्वावर सदर शिल्प नदी शेजारच्या शिवमंदिरात आणून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नदी पात्रात असलेले शिल्प सुरक्षित आहे. आता फक्त विभागाने दखल घेण्याचे गरज आहे.
