अहेरी : जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरी नोंदणी क्रमांक 186 ची निवडणूक येत्या 16 मार्च 2025 ला होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी शिक्षकांचे सोसायटी बचाव पॅनल व समता पॅनल तयार झाले आहे. विद्यमान परिस्थितीत सत्तारूढ असलेल्या संचालक मंडळाचे सोसायटी बचाव पॅनल आहे. या पॅनलने आपले उमेदवार तर जाहीर केले. सोबतच अध्यक्षपदाच्या नावावर सुद्धा शिक्कामोर्तब केले आहे. पंचायत समिती अहेरी येथे कार्यरत प्राथमिक शिक्षक महेश मडावी यांचे नाव अध्यक्षपदासाठी सोसायटी बचाव पॅनल कडून पुढे करण्यात आले आहे.
पत संस्थेच्या यावेळेसच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोनच पॅनल तयार झाले असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. एवढे मात्र नक्की. या निवडणुकीत रंगत यावी यासाठी सोसायटी बचाव पॅनलने अध्यक्षपदाचे नाव जाहीर करून शिक्षक मतदारांसमोर पर्याय सादर केला आहे.
अनु सुचित जाती /जमातीच्या प्रवर्गातून नामांकन दाखल केलेले महेश मडावी मितभाषी शिक्षक म्हणून पंचायत समिती अहेरी व नजीकच्या पंचायत समितीमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचे वास्तव्य अहेरी येथे आहे. पतसंस्था सभासदांची कामे सोयीने व्हावी, सभासदांना 24 तास सेवा देता यावी म्हणून महेश मडावी यांना अध्यक्षपदासाठी पुढे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
कोणत्याही निवडणुकीत निवडणुका संपन्न झाल्यानंतर गटनेता निवडण्यात येतो आणि त्याचे नाव प्रमुख पदासाठी पुढे करण्यात येत असते. पण सोसायटी बचाव पॅनल ने निवडणुकीच्या आधीच अध्यक्ष पदाचे नाव जाहीर केले आणि विरोधी पॅनलच्या अडचणींमध्ये वाढ केल्याचे दिसून येत आहे. आम्ही निवडणुकीसाठी सज्जत आहोतच पण अध्यक्षपद सुद्धा निश्चित केले हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न सोसायटी बचावचा पॅनलचा दिसून येत आहे.
सोसायटी बचाव पॅनल कडून महेश मडावी यांचे नाव अध्यक्ष पदासाठी पुढे करण्यात आले असल्याने समता पॅनलच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या पॅनल मध्ये सुद्धा दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे. आपणच अध्यक्ष व्हावे असे प्रत्येक दिग्गजाना वाटत असते. विरोधात असलेल्या समता पॅनल मध्ये अध्यक्षपदासाठी स्पर्धा व्हावी आणि ही निवडणूक सोयीस्कर व्हावी यासाठी सोसायटी बचाव पॅनेलने महेश मडावीच्या नावावर शिक्कामोर्तब केले अशी चर्चा शिक्षकांमध्ये आहे.
