आलापल्ली : येथील मूळ रहिवासी आणि गडचिरोली पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत असलेले संतोष मंथनवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले. मृत्यू समयी पोलीस मदत केंद्र ग्यारापत्ती येथे कार्यरत होते.
संतोष मंथनवार हे मूळचे आलापल्ली येथील आहेत. वेलगूर रोड आलापल्ली येथे त्यांचे निवासस्थान आहे. पोलीस दलात नियुक्ती झाल्यानंतर स्थानिक परिसरातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी कार्य केले आहे. काही वर्षे ते पोलीस स्टेशन भामरागड येथे कार्यरत होते. तेथून त्यांची बदली पोलीस स्टेशन अहेरी येथे झाली. पोलीस स्टेशन अहेरी येथे कार्यरत असताना वाहतूक शाखेत त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले.
यानंतर पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे त्यांची बदली झाली. तेथून ते ग्यारापत्ती येथे बदलून गेले. सध्या ते गॅरपत्ती येथे कार्यरत होते. आज सकाळी छातीत दुखायला लागल्याने घरापती येतील प्राथमिक आरोग्य पथकामध्ये उपचारास्तव नेण्यात आले. तेथून त्यांना ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे संदर्भ सेवेसाठी पाठवण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा निधन झाल्याचे स्पष्ट केले.
संतोष मंथनवार यांच्या मागे पत्नी, दोन मुले, नातेवाईक असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
अहेरी येथे कार्यरत असताना विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ते सक्रिय होते. स्थानिक परिसरातील सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

