सुवर्णकार बांधवांनी साजरा केला उगादीचा सण
अहेरी : परंपरागत पद्धतीने सोन्याचे दागिने घडविण्याचा व्यवसाय करणारा सुवर्णकार बांधव स्थानिक परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. या समाजामध्ये उगादी या सणाचे महत्त्व मोठे आहे. गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी येणारा उगादीचा सण सुवर्णकार बांधव सहकुटुंब साजरा करतात. अहेरी व परिसरात सुवर्णकार बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला.
हिंदू पंचांगाप्रमाणे गुढीपाडवा नववर्ष आहे. गुढीपाडव्यापासून विविध कामांचा प्रारंभ केला जात असतो. शेतकरी या दिवसापासूनच सालगडी कामावर ठेवतात. शेतीच्या कामाला सुरुवात होते. अहेरी व परिसरात सुवर्णकार बांधवांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. वास्तव्यास असलेला सुवर्णकार बांधव बहुसंख्येने तेलुगु संस्कृतीशी जोडून आहे. आंध्र, तेलंगणा या राज्यामध्ये गुढीपाडव्याच्या एक दिवसाआधी येणाऱ्या दिवसाला उगादीचा सण साजरा करतात. स्थानिक परिसरात उगादीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अहेरी आलापल्ली, आष्टी , सिरोंचा, भामरागड या परिसरात वास्तव्यास असलेल्या सुवर्णकार बांधवानी उगादीचा सण साजरा केला.
प्रामुख्याने अमावस्येच्या दिवशी उगदीचा सण येतो. बहुतेक सण अमावस्येला येत असतात. यावर्षी 29 मार्च 2025 ला उगादीचा सण आला. निसर्गात वाढलेल्या ऋतुपुष्पांना आणून घरातील मंदिराच्या देवाऱ्यात शोभिवंत आरास तयार केली जाते. सुवर्णकार व्यवसायात वापरली जाणारी अवजारे ठेवली जातात. देवी महाकालीचा फोटो ठेवल्या जातो. आरास केलेल्या ठिकाणी 24 तास ठेवणारा अखंड असा दिवा मांडल्या जातो.शुद्ध तुपापासून तेवणारा दिवा असतो. या दिवशी ऋतू फळापासून सरबत तयार केल्या जाते. आंबा,चिंच, कडुलिंबाचा मोहोर, साखर आणि पाण्यापासून सरबत तयार करून घरच्या सगळ्यांना प्यायला दिले जाते. तांदूळ, बरबटी, मुग, मोट अशा नऊ धान्याचे पकवान तयार केल्या जाते. पुलीहोरा म्हणजे आंबट भात या दिवशी तयार केला जातो. मुगाचे वडे सोबतीला असतात. सहकुटुंब एकत्रित येऊन या दिवशी जेवण करीत असतात.
दुसऱ्या दिवशी आंघोळीनंतर पूजा केली जाते. नैवेद्य ठेवला जातो. पायसम म्हणजे भाताची खीर हा नैवेद्य असतो.
सुवर्णकार समाज बांधव संतोष बेझंकीवार यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, सुवर्णकार बांधवांमध्ये उगादी सणाचे महत्त्व मोठे आहे. स्पर्धेच्या काळात प्रत्येक समाज बांधव आता हा व्यवसाय करीत नाही. बऱ्याच बांधवांनी नोकरी स्वीकारली आहे. असे असले तरी नोकरीवर असणारे समाज बांधव सुद्धा उगादीच्या सणाला कुटुंबासहित एकत्रित येतात. हा सण साजरा करतात. व्यवसायाशी संबंधित अवजारे घरी नसेल तर प्रतीकात्मक अवजार पूजेच्या ठिकाणी ठेवल्या जाते. पूजा केली जाते. उगादी सणामुळे नोकरी निमित्ताने बाहेर असलेली मंडळी एकत्रित येते. एकमेकांमध्ये मिसळते. कौटुंबिक ऐक्य तयार होते. या सणातून कौटुंबिक ऐक्याची भावना प्रबळ होत आहे असे ते म्हणाले.
उगादी सणाच्या संदर्भात त्यांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या. एका प्लेटमध्ये तांदळाच्या अक्षदा तयार केल्या जात होत्या. कुटुंबातील सदस्यांना थोड्या-थोड्या प्रमाणात त्या अक्षता उचलायला लावल्या जात होते. अक्षता मध्ये असलेले तांदळाचे दाणे मोजले जायचे. सम आणि विषम प्रमाणात त्याची विभागणी व्हायची. यावरून येणारे वर्ष कसे जाईल याचा अंदाज बांधला जात होता. आपले वडील सत्यनारायण बेझंकीवार करायचे.असे सांगून उगादीच्या सणाच्या जुन्या आठवणी संतोष बेझंकीवार यांनी ताज्या केल्या.

