अहेरीत ना बॅनर, ना बँड
अहेरी : प्रदीर्घ कालावधीनंतर चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा सदस्य नामदेव किरसाण अहेरी विधानसभा मतदारसंघाच्या विविध तालुक्यांमध्ये आले. आढावा बैठका घेतल्या. अशीच एक आढावा बैठक अहेरी येथे घेतली. 23 मे 2025 ला ही आढावा बैठक तहसील कार्यालय अहेरी येथे संपन्न झाली. खा. नामदेव किरसाण अहेरी येथे आले असले तरी ना बॅनर, ना बँड स्वागताचा प्रकार शून्यच दिसला.
सामान्यता कोणताही मोठा राजकारणी एखाद्या गावात येत असेल तर मोठमोठे बॅनर लावले जातात. बॅनरच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्याचा हा एक उत्तम पर्याय असतो. अहेरी येथे सगळे काही थंड वातावरण होते. किरसाण आले. आढावा बैठक घेतली. निघून गेले. असा प्रकार घडला.
अहेरी विधानसभा मतदारसंघातल्या पाचही तालुक्यात राजकीयदृष्ट्या अहेरी हे महत्त्वपूर्ण गाव आहे. विविध पक्षाचे मोठे पदाधिकारी येथे राजकीय हेतूने येत असतात. बैठका, सभा घेतात. सभा बैठका असल्या की बॅनरच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जाते. किरसाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची संबंधित आहे. अनेक वर्ष सत्ता गाजवलेला हा पक्ष आहे. केंद्रात विरोधी पक्ष आहे. या पक्षाचा लोकसभा सदस्य अहेरीत येतो. त्याचा एकही बॅनर गावात लागत नाही. हा विषय सध्या चर्चेचा झाला आहे.
एप्रिल 2024 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य लोकसभा सदस्य नामदेव किरसान यांना अहेरी विधानसभा मतदारसंघातून मिळाले. प्रदीर्घ कालावधीनंतर ते अहेरी विधानसभा मतदारसंघात आल्याने त्यांची भेट फारशी चर्चेची ठरली नाही. अहेरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोतावळा आहे. कार्यकर्ते समाज माध्यमांवर सुद्धा सक्रिय आहेत. किरसाण अहेरी येथे येणार आहेत हे ठरले तेव्हाच मोठी वातावरण निर्मिती आवश्यक होती. तसे चित्र अहेरी येथे तयार झालेच नाही. अहेरीच्या विविध चौकांमध्ये, रस्त्यावर स्वागताचे बॅनर झळकने गरजेचे होते. बॅनर दिसलेच नाही. याला काटकसर म्हणायचे, अलिप्तता समजायची, की नाराजी समजायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या संदर्भात काँग्रेसचे जुने व निष्ठावान कार्यकर्ते अशोक आईंचवार यांची प्रतिक्रिया घेतली असता अहेरी येथील आढावा बैठकीदरम्यान आपण वैयक्तिक कार्यक्रमानिमित्ताने राजुरा येथे गेलो होतो. यासंदर्भात आपल्याला कल्पना नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

