ज्ञानेश्वर रक्षक यांची मागणी
अहेरी : ‘सारा भारत रहे शिपाई, शत्रु को दहशाने’ असा उल्लेख राष्ट्रवंदनेत करून एक दिवस चीन भारतावर युद्ध लादेल असे भाकीत करणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेचा समावेश पदव्युत्तर अभ्यासक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथे करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नाही.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने 51 हजार विद्यार्थी विद्यापीठ गीत गायन करतील असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. उपक्रम स्तुत्य असला तरी विद्यापीठाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या विचारा विचाराचा प्रचार आणि प्रसार व्यापक पद्धतीने करण्याचे कोणतेही नियोजन विद्यापीठाकडे नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराची देशाला आज खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यांच्या सर्वधर्मसमभाव तत्त्वाची शिकवण प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरकडून त्यांच्या साहित्याचा समावेश विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमात करावा अशी मागणी श्री गुरुदेव युवा मंचचे प्रवर्तक ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी केली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार विश्वव्यापी व सर्व समावेशक आहेत. मी जे करीत आहे ते अधिक सुंदर करणे, अधिक व्यवस्थित करणे हाच माझा धर्म आहे. माणूस जन्माला येणे व माणूस बनणे ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहे. असा माणुसकीचा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या कीर्तनातून आणि विचारातून दिला. त्यांच्या विचाराला आज प्रत्येक व्यक्ती मानतो. प्रत्येकांनी त्यांचे विचार स्वीकारले आहे. असे असले तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा समावेश शासनाकडून विविध वर्गांच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेला नाही. कुठेतरी एक दोन वाक्य दिसतात आणि राष्ट्रसंतांचे विचार थांबविल्या जातात.
सर्वधर्मसमभाव निर्माण करण्यासाठी राष्ट्रसंतांच्या विविध विचारांचा समावेश पहिल्या वर्गापासून तर पदव्युत्तर वर्गापर्यंत करणे आवश्यक आहे. शासनाने या अनुषंगाने समिती गठित करून त्यांचा विचार अभ्यासक्रमात समाविष्ट करावा अशी मागणी ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी केली आहे.

