सुट्ट्या लागण्यापूर्वीच जलद प्रवासासाठी बसेसचा वापर
अहेरी : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढावा म्हणून राज्य शासनाच्या मानव विकास आयुक्तालयाकडून 2012 ला मानव विकास योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येतात. पैकी निळ्या बसेसची एक योजना आहे. या बसेस वर्ग एक ते बारावीच्या मुलींच्या हक्काच्या आहेत. या बसेस चालवण्याची जबाबदारी राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडे देण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून या योजनेला हरताळ फासण्यात येत असून यावर्षी सुट्ट्या लागण्यापूर्वीच मानव विकास मिशनच्या बसेस ‘पांढरे बोर्ड’ लावून जलद प्रवासासाठी वापरण्यात येत आहे. आगार अहेरी व आगार गडचिरोली या दोन्ही आगाराकडून सदरचा प्रकार सर्रास सुरू आहे.
मानव विकास मिशनच्या बसेस पांढरे बोर्ड लावून जलद प्रवासासाठी वापरताच येत नाही. याच अटीवर राज्य परिवहन मार्ग महामंडळाने या बसेस स्वीकारल्या आहेत. असे असताना शासनाचे दुर्लक्ष, जनतेचे अज्ञान, निवडणुका आल्या की राजकारण्यांचे ओरडणे आणि उर्वरित गप्प बसणे यातून राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपले ‘उखळ’ पांढरे करून घेत आहे.
जलद प्रवासासाठी या बसेसचा वापर अहेरी व गडचिरोली आगाराकडून सर्रास होत आहे. दुसरीकडे बस अभावी मुली आणि मुले ग्रामीण भागातील बस थांब्यांवर ताटकळत उभे राहत आहेत. बस फेऱ्या कमी असल्याने मानव विकास मिशनच्या बसेसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी भरले जातात. बस थांब्यावर मुले आणि मुली बसची वाट पाहत असतात. मुले-मुली बसला हात दाखवतात. बस थांबत नाही मुलांची शाळा बुडते असे दुर्दैवी चित्र सुद्धा स्थानिक परिसरात दिसते आहे. मुलांची शाळा मिळाली नाही तरी चालेल पण राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराचा ‘गल्ला’ भरण्याचा सर्रास प्रकार सुरू आहे.
तत्कालीन शासनाकडून सुरू करण्यात आलेली ही अतिशय चांगली योजना आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शाळांमधल्या उपस्थितीचे प्रमाण वाढले. स्वतःच्या घरी राहून शिक्षण घेण्याचे पालकांचे आणि मुलींचे स्वप्न साकार झाले. मुलींसोबत मुलांनाही या योजनेचा लाभ होत आहे. मानव विकास योजनेला असलेला निधी बसेसच्या खरेदीसाठी वापरण्यात आला. आणि राज्यातल्या विविध आगारांना या बसेसचा पुरवठा करण्यात आला. या बसेसच्या माध्यमातून शंभर टक्के मोफत प्रवास मुलींना उपलब्ध करून देण्यात आला आहे. असे असले तरी स्थानिक परिस्थिती पाहू जाता आगार अहेरी यादृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करीत नसल्याचे लक्षात येते. अहेरी,भामरागड, मूलचेरा, सिरोंचा, एटापल्ली तालुक्यासाठी प्रत्येकी सहा बसेस नेमून दिलेल्या आहेत. सहा बसेस नेमून दिल्या असल्या तरी सहा बसेसचा या तालुक्यांसाठी वापर होत नाही. भामरागड तालुक्यात दिवसभरासाठी मोजक्या दोन-तीन बसेस दिल्या जातात. एटापल्ली तालुक्यातही अशीच अवस्था आहे. गडचिरोली, चंद्रपूर मार्गावर बसेस सोडून उत्पन्न कमविण्याचा प्रकार अहेरी आगाराकडून सुरू आहे.
उन्हाळ्यात शाळा बंद होतात. एस.टी. कडून हंगामी बस फेऱ्या सुरू केल्या जातात. मानव विकास मिशनच्या बस फेऱ्या रद्द होतात. याचा फायदा घेत परिवहन महामंडळाकडून या बसेसचा वापर जलद बस फेरीसाठी किंवा लांब पल्ल्याच्या बसेस साठी करण्यात येतो. अहेरी व गडचिरोली आगार सुट्ट्यांची वाट न पाहता गल्ला भरण्याच्या हेतूने आधीच कामाला लागला आहे.

