एक प्रादेशिक वर्तमानपत्र आज सकाळी हातात घेतलं. बातम्या वाचायला मुख्य पानापासून सुरुवात केली. बातम्या वाचत-वाचत आतल्या पानात शिरलो. उत्कृष्ट काम असताना पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे तूर्तास मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवले गेलेले सुधीर मुनगंटीवार यांची बातमी वाचली. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच दिल्लीची वारी केली. केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. छायाचित्रा सहित बातमी वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आली. दोघांचे चेहऱ्यावर पराकोटीचे हास्य आहे. बल्लारपूरचा मराठी माणूस दिल्लीत जातो. मराठी माणसाला भेटतो. मराठी माणसाच्या विकासाची मागणी करतो यातून हेच हास्य उमटले. समजायला वेळ लागत नाही. आनंद आहे. बातमी वाचून मात्र दुःख झाले. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघापासून पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर येणाऱ्या 353 सी या राष्ट्रीय महामार्गाची मागणी यात नव्हती. 353 सी राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था सुधीर मुनगंटीवार यांना माहित नाही असे होऊच शकत नाही. गडकरींना देण्यात आलेल्या निवेदनात 353 सी च्या दुरुस्तीचे दोन-चार शब्द घातले असते तर सुधीर भाऊंचे काय बिघडले असते ? समजायला मार्ग नाही. स्वार्थ असावा. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासाठी सुधीर भाऊंनी ‘चांद-तारे’ तोडून आणावे. आमच्याबद्दल एवढा आकस ठेवू नये. गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदार संघाच्या निर्मितीपूर्वी आपण सगळे एकच होतो. आपण हंसराज आहेरांना सोबत घेऊन अनेकदा मते मागायला आपण आले आहेत. मतदार संघाची पुनर्रचना झाली. अहेरी विधानसभा मतदारसंघ गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात गेला आणि आपण आम्हाला वाळीत टाकले. योग्य नाही. जाणे येणे तर बंदच केले. आपल्यासारखा परिपक्व राजकारणी दुजाभाव करतो. वाईट वाटते.
मूल शहरानजीक असलेल्या रेल्वे ओव्हर बेब्रिजचे काम, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930, मूल-चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना आरसीसी काँक्रीट ड्रेन मंजूर करणे, केंद्रीय मार्ग निधीच्या माध्यमातून मंजुरी देणे, कोठारी गावाजवळील दोन किमी अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करणे, मूल तालुक्यातील उमा नदीवर तसेच अंधारी नदीवर मोठ्या पुलाची निर्मिती करणे अशा विविध मागण्या सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी केल्या.
बल्लारपूर, पोंभुर्णा, मूल तालुक्यात आपण चकाचक रस्ते निर्मिती केली. पुढच्या पंचवीस वर्षाचे राजकारण सुरक्षित करून ठेवले. समजता येते. राजकारण आहे. कुणीच सोडत नाही. पुढची तरतूद प्रत्येक करून ठेवते. 1982 ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची राज्याच्या नकाशावर निर्मिती झाली. तेव्हा सख्खे होतो. आता सावत्र झालो. सावत्र असलो तरी पाच-दहा टक्के आत्मीयता असते. आपण एक टक्काही ठेवत नाही. गेल्या आठ वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी चे रखडले आहे. आष्टी पासून सिरोंचा पर्यंतचा हा मार्ग पूर्ण होण्याची शक्यता यावर्षी सुद्धा नाही. असा प्रकार आपल्या मतदारसंघात असता तर आपल्याला सहन झाला. आपण कंत्राटदाराचे धिंडवडे काढले असते. 353 सी राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था आपल्याला माहित आहे. वर्तमानपत्रातून वाचली असेल भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपल्या कानावर घातली असेल. आपण दखल घेतली नाही. काम करण्यासाठी कंत्राटदार व अधिकाऱ्यांना बाध्य केले नाही. अशा परिस्थितीत पुढल्या निवडणुकीत येऊन अहेरी विधानसभा मतदारसंघात मते मागितले तर याला काही अर्थ उरणार नाही. काम करायचे नाही. समजून-उमजून दुर्लक्ष करायचे. आणि मते मागायची. हा प्रकार निश्चितच चुकीचा असेल. प्रश्न पक्षाचा नाही आणि प्रश्न राजकारणाचा सुद्धा नाही. 353 सी या राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे व शासनाचे याकडे होत असलेले दुर्लक्ष यातून भाजपला मानणारे सुद्धा भाजप पासून दूर जाता हे वास्तव आहे. समस्या जनतेची आहे. जन समस्येच्या दृष्टीने याकडे आपण पाहिले पाहिजे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी साठी निधी मंजूर झाला आहे. निधी पडून आहे. कामाची प्रगती शून्य आहे. आपल्याला फक्त या समस्या कडे लक्ष घालावयाचे आहे. तुम्हाला तुमच्या मतदारसंघातला निधी 353 सी च्या कामासाठी द्यावयाचा नाही. तुम्ही तुमच्या मतदार संघासाठी भरपूर निधी आणा. बल्लारपूर, पोंभुर्णा, मूल तालुक्याचा चेहरा- मोहरा बदलवा. बल्लारपूर, पौंभुर्णा, मुलच्या जनतेचा विकास झाला तर आम्हाला आनंदच असेल. पण आमच्या प्रती आकस मात्र ठेवू नका. एवढा आकस कशासाठी ?
रेतीचे रामायण !
काहींना नेहमीच वादात राहण्याची सवय असते. कधी खरे बोलून तर कधी आरोप करून. डा. देवराव होळी असेच वादग्रस्त व्यक्तिमत्व. विधानसभेच्या कार्यकाळात वादग्रस्त प्रतिक्रियांमुळे त्यांची तिकीट कापल्या गेली. असा जिल्ह्यातील राजकारण्यांना वाटते. असो. हा त्यांचा आणि राजकीय विश्लेषकांचा विषय आहे. गडचिरोली जिल्ह्यात 100 कोटीच्या रेतीची तस्करी झाली असा आरोप त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. जिल्ह्याच्या राजकारणात बॉम्ब फुटला. कुठून आकडेवारी गोळा केली माहिती नाही. रेती तस्करी होते. प्रशासनाकडून थांबविण्याचे प्रयत्न होतात. अपुऱ्या मनुष्यबळामुळे रेती तस्करीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. हे दिसते. वर्षभरात शंभर कोटी पर्यंत रेतीची तस्करी करण्यात आली असा त्यांनी केलेला आरोप कितपत सत्य आहे. माहिती नाही. आपल्याच सरकारला त्यांनी घरचा आहेर दिला आहे. एवढे मात्र नक्की. मागील अडीच वर्षात भाजप आणि मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर होते. आता तर बहुमताने भाजप व मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर आहे. देवराव होळी यांच्या आरोपाचे भाजप किती मनावर घेते. हे भविष्यात लक्षात येईल. आज मात्र जिल्ह्यातल्या राजकारण्यांना चर्चेसाठी मसाला मिळाला आहे. आरोपाच्या दोन बाजू होऊ शकतात. देवराव होळी स्थानिक प्रशासनावर नाराज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा जिल्ह्याच्या भाजपमध्ये घुसफुस असावी. त्यातून देवराव होळी यांनी असा आरोप केला असे म्हणता येऊ शकते. देवराव होळी बरळायला शिकवू राजकारणी नाहीत. पाच वर्ष आमदारकी आणि त्यापूर्वीसुद्धा त्यांनी जिल्ह्यात राजकारण केले आहे. देवराव होळी यांच्या आरोपाने जिल्ह्यात ‘रेतीचे रामायण’ पुन्हा एकदा सुरू झाले आहे.

