मागील दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये अशोक नेते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर एकतर्फी निवडून आले. काँग्रेसचे उमेदवार व आताचे भाजपवासी डॉ. नामदेव उसेंडी यांचा त्यांनी पराभव केला. या निवडणुकीत मात्र अशोक नेते यांना हार पत्करावी लागली. काँग्रेसच्या डॉ.नामदेव किरसाणांनी पराभव केला. दोन निवडणुकांमध्ये एकतर्फी विजय मिळाल्यानंतर तिसऱ्यांदा अशोक नेते यांना जनतेने नाकारले. दोन्ही विजयात त्यांच्या पाठीवर अहेरी विधानसभा मतदारसंघाने हात ठेवला होता. मोठी आघाडी मिळवून दिली. तरीपण गडचिरोली, आरमोरी, वडसाच्या परिसराकडे जास्त लक्ष घातले. अहेरीकडे दुर्लक्ष केलं. आताही अशी स्थिती आहे. गोंदिया-बल्लारशा दुसऱ्या रेल्वे लाईनला मंजुरी मिळाली. जवळपास 4500 कोटीची तरतूद करण्यात आली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तसे पत्र दिले. हे पत्र त्यांनी समाज माध्यमांवर व्हायरल झाले. आनंदाची बाब आहे. अभिनंदन करावे लागेल. भारतातले दुपदरी रेल्वे मार्ग आता चौपदरी व्हायला लागले आहेत. गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्ग दुपदरीनंतर चौपदरी झाला तरी आनंदच असेल. पण येथे एकही पदर नाही त्याचे काय. आमच्या डोक्यावरचा आपण पदरच काढून टाकला. सिरपुर-अहेरी चाळीस किलोमीटरचे अंतर आहे. हवेतील अंतर पकडले तर तीस किलोमीटर आहे. येथे एक पदर टाकण्याची व्यवस्था केली असती तर आम्हालाही आनंद झाला असता. चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून आपण दोनदा निवडून आले. अहेरी विधानसभा मतदारसंघ चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघातच मोडतो. अहेरी विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने आपल्याला मतदान केले आहे. आमच्यासाठी एक पदराचे दोनशे-तीनशे करोडचे पत्र आणले असते तर आमच्या विकासाला सुद्धा चालना मिळाली असती.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक नेते यांना हार पत्करावी लागली. अशोक नेते पराभूत झाले. पराभव पत्करावा लागल्यानंतरही ते सक्रिय आहेत ही आनंदाची बाब आहे. त्यांचा सक्रियपणा चामोर्शी पासून पुढे दिसत आहे. इकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होताना दिसते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी आष्टी पासून सिरोंचा पर्यंत रखडला आहे यावर्षीही पूर्ण होण्याची शक्यता नाही. जनतेच्या वाट्याला विघ्नच येणार आहेत. किती लोकांचा बळी जाईल सांगता येत नाही. नितीन गडकरींचेही एक पत्र आणले असते बरे झाले असते. नितीन गडकरीनी आनंदाने पत्र दिले असते. मरगळलेले सगळे कंत्राटदार कामाला लागले असते. हीच भूमिका रेल्वे मार्गाच्या संदर्भात सुद्धा असायला पाहिजे. 2020 ला तेलंगाना सरकारच्या निधीतून प्राणहिता नदीवर अहेरी नजीक 80 करोड रुपये खर्च करून मोठा पूल झाला. कागजनगर जवळ आले. स्थानिक जनता कागजनगर येथून रेल्वेचा लाभ घेत आहे. कागजनगर-सिरपूर येथून अहेरी-आलापल्ली पर्यंत रेल्वेचा फक्त एक पदर मंजूर केला असता तर आम्हाला अहेरी-आलापल्ली वरूनच रेल्वेत बसता आले असते. आम्हीही आपले मतदार आहोत. वेळ गेली नाही. पुरवणी पत्र आणता येते. सिरपूर-कागजनगर-अहेरी पर्यंत पुरवणी पत्रआणा. आम्हालाही रेल्वेचा लाभ होऊ द्या.
अहेरी परिसर निसर्गाने नटलेला आहे. इथे पर्यटनाला चालना देण्यासाठी खऱ्या अर्थाने रेल्वेची गरज आहे. राज्यातला सर्वात मोठा जंगल गडचिरोलीत आहे. गडचिरोली जिल्ह्यातला सर्वात मोठा जंगल अहेरी, आलापल्ली, एटापल्ली, भामरागड मध्ये आहे. वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्यामुळे येथे पर्यटन नावापुरतेच आहे. हेमलकसा,भामरागड,कालेश्वर, आवलमरी, ग्लोरी ऑफ आल्लापल्ली उपेक्षित आहे. रस्त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून पर्यटनावर प्रचंड मोठा परिणाम पडला आहे. रेल्वे असती तर पर्यटनासाठी पर्याय उपलब्ध असता. आता मात्र तसेही नाही. म्हणून 200-300 करोड चे पुरवणी पत्र गरजेचे आहे.

