प्रतिनिधी
अहेरी : मूळ नियुक्ती जि प. नाशिक. दहा वर्षाची सेवा दिल्यानंतर ‘स्व’ गावाच्या ओढीने नाशिक सोडले. जि. प. गडचिरोलीची प्रथम नियुक्ती पंचायत समिती एटापल्लीच्या दुर्गम, अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त असलेल्या वाळवी या गावात मिळाली. शाळा नाही, विद्यार्थी संख्या एक. परिश्रम, जिद्द आणि लोकांचे सहकार्य यातून गोटूलमध्ये शाळा सुरू केली. एका विद्यार्थ्यावर प्रभार सांभाळला. आज 27 विद्यार्थी आहेत. गट्टा येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वाळवी या गावाचे शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी सोने केले. उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीच्या निवडणुकीत समता पॅनलकडून ते रिंगणात आहेत. चांगल्या व सामाजिक व्यक्तीची निवड करा. संस्थेची आपोआपच प्रगती होईल असे त्यांचे मत आहे.
प्रश्न : निवडणूक लढवावीशी का वाटली.
उत्तर : पतसंस्थेचा सभासद आहे. कर्ज काढल्याशिवाय शिक्षक कुठलीच कामे करू शकत नाही. पतसंस्थेत अनेक अडचणी दिसतात. चांगल्या माणसांची गरज आहे. व्यापक दृष्टिकोन ठेवून पतसंस्थेला प्रगतीपथावर नेता येते. म्हणून पतसंस्थेच्या निवडणुकीत उत्तरलो आहे.
प्रश्न : मनात असलेल्या योजना सांगा.
उत्तर : येत्या काही वर्षात पेन्शनधारक शिक्षक सेवानिवृत्त होतील. यानंतर पेन्शन नसलेले शिक्षक म्हणजेच डीसीपीएस धारक शिक्षक पतसंस्थेत असतील. शासनाने पेन्शन नाकारले. शासन पेन्शन देईल की नाही सांगता येत नाही. पतसंस्थेच्या माध्यमातून शिक्षकांना वृद्धापककाळाची सोय म्हणून पेन्शन देता येते काय ? हा प्रयत्न आपण करणार आहोत. पेन्शनची योजना आणण्याचा आपला प्रयत्न असणार आहे.
प्रश्न : विद्यमान कार्यकारिणीकडे कसे बघता.
उत्तर : मी कोणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही. सभासद संख्या वाढविण्याकडे या कार्यकारणीने दुर्लक्ष केले. एवढे मात्र नक्की. जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीचे कार्यक्षेत्र पंचायत समिती अहेरी, भामरागड, एटापल्ली या तीन पंचायत समितीसाठी आहे. तीनही पंचायत समितीमध्ये 1200 चे वर शिक्षक आहेत. मग सभासद संख्या 418 कशी. आपण ही सभासद संख्या वाढवण्याचा प्रयत्न करू.
प्रश्न : समता पॅनल ची उमेदवारी का स्वीकारली.
उत्तर : मी केलेल्या कामाची दखल घेऊन समता पॅनल कडून मला आग्रह करण्यात आला. सर्व समावेशक पॅनल आहे असे माझे मत आहे. प्रतिसाद चांगला आहे. म्हणून समता पॅनल ची उमेदवारी स्वीकारली.
प्रश्न : विशिष्ट लोकांचे पॅनल आहे असा विरोधकांकडून होत आहे. काय मत आहे.
उत्तर : याबाबत मी ऐकले आहे. नैराश्येच्या भावनेतून असे आरोप केल्या जात आहे. पाच वर्षाचा कार्यकाळ नऊ वर्षावर गेल्यानंतरही समाधानकारक कार्य विरोधकांना करता आले नाही. मोठा कार्यकाळ मिळाला. भरपूर काही करता आले असते. खुर्ची वाचविण्यात वेळ घालवला. अब हमारी बारी है !
प्रश्न : किती उमेदवार निवडून येतील.
उत्तर : पूर्णच येथील. आमच्या पॅनलचा प्रत्येक उमेदवार सक्षम आहे. युवा उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. जुने फक्त दोन उमेदवार आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन नवीन युवा उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न समता पॅनलनी केला आहे.
प्रश्न : पुन्हा काही सांगा.
उत्तर : जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेचे कार्यालय अहेरी येथे आहे. संचालक मंडळावर स्थानिक असावे असे मला वाटते. अहेरी, आलापल्ली नागेपल्ली या गावातील शिक्षक उमेदवार पतसंस्थेवर निवडून गेल्यास या पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त वेळ देता येईल. शिक्षकांचे कामे गतीने करता येईल. उच्चशिक्षित शिक्षक व शिक्षकांचे उच्चशिक्षित पाल्य यांना प्रोत्साहित करून त्यांच्या विकासाचा प्रयत्न आपण करू. कमी व्याज दरामध्ये शिक्षकाच्या पाल्यांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी आपण आग्रही आहोत. पतसंस्थेच्या सहकार्याने शिक्षकाचे पाल्य शिकावे, मोठे व्हावे हा आपला हेतू आहे.
श्रीकांत काटेलवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी मनमोकळी चर्चा केली. 2024- 25 चा राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. अनेक परिषदांना ते उपस्थित होते. लोक सहभागातून वाळवी सारख्या गावात जिओ टावर, टीव्ही, मोबाईल,टॅब, सोलर पॅनल,प्रिंटर इत्यादी वस्तूंची निर्मिती त्यांनी केली. राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था नवी दिल्लीच्या माध्यमातून त्यांच्या या कार्याची दखल घेण्यात आली. पुस्तक तयार करण्यात आले. वाळवीच्या शाळेची विधिमंडळात चर्चा झाली. 15 आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. समिती गठीत झाली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांना वाळवी येथे शाळा बांधण्याचे निर्देश देण्यात आले. गोटूलमध्ये भरणारी शाळा आज पक्क्या इमारतीमध्ये सुरू आहे. नृत्यांच्या माध्यमातून जि. प.नाशिक येथे 17 लाखाचा निधी गोळा करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुद्धा श्रीकांत काटेलवार यांनी केले आहे.
