प्रतिनिधी
अहेरी : 16 मार्च 2025 ला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनल सज्ज झाले आहेत. आपली पूर्ण ताकद निवडणुकीच्या प्रचारात वापरत आहेत. दोन्ही पॅनल ताकतीने मैदानात उतरले आहेत. याव्यतिरिक्त एक अपक्ष उमेदवार सुद्धा मैदानात आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरलेले हे शिक्षक उमेदवार प्रामुख्याने पंचायत समिती एटापल्ली आणि पंचायत समिती अहेरी येथील आहेत. एकूण 27 उमेदवार आहेत. यासाठी 27 उमेदवारांनी रजा घेतली आहे असे सांगण्यात येत आहे. पंधरा दिवसाच्या रजा घेतल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. 15 दिवसाच्या रजा घेतल्या गेल्या असल्या तरी गेल्या दोन महिन्यापूर्वीपासूनच शिक्षक उमेदवार कामाला लागले होते. मानसिकता पूर्ण निवडणुकीत होती. मानसिकता दुसरीकडे असली तर करावयाचे काम सुद्धा धडगतीने होत नसते. अर्थातच निवडणुकीच्या मैदानात असलेल्या शिक्षक उमेदवारांनी काही का असेना थोडेफार तरी विद्यादानाच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. निश्चितच अभ्यासक्रम मागे राहिला आहे. मग मागे राहिलेल्या अभ्यासक्रमाचे काय असा प्रश्न आता सुजाण पालकांना पडला आहे. शिक्षक मतदार मतदान करतील. शिक्षक उमेदवार निवडणूक जिंकतील. पण ज्या अभ्यासक्रमाच्या भरवशावर विद्यार्थी मोठे होतात, त्या अभ्यासक्रमाचे काय हा महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन्ही पंचायत समिती मिळून तब्बल 27 शिक्षक रजेवर आहेत. अर्थातच रजा मंजूर झाली असेल यात काही शंका नाही. कुणीच जोखीम स्वीकारणार नाही.
पंधरा दिवसाचा कालावधी खूप मोठा आहे. पुढील महिन्यात वार्षिक परीक्षेचे आयोजन करण्यात येत असते. वार्षिक परीक्षा डोक्यावर येऊन ठेपली असताना मागे पडलेल्या अभ्यासक्रमाचे काय होईल ? पूर्ण केल्या जाईल की अशीच परीक्षा घेतली जाईल असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे.
पतसंस्थेच्या या निवडणुकीत गणित, विज्ञान सारखे विषय शिक्षक सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गणित, विज्ञान विषय महत्त्वाचे समजले जातात. गणित विज्ञान सारख्या विषयाकडे दुर्लक्ष होऊ नये अशी पालकांची अपेक्षा आहे.
