दिवाकर वाघमारे यांचे आवाहन
अहेरी : जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीच्या निवडणुकीत विद्यमान दोन्ही पॅनलने मोठ-मोठी आश्वासने दिली आहेत. जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. निवडणूक झाल्यानंतर जाहीरनामांचे काय होते हे मतदारांना चांगल्या प्रकारे माहित आहे. सकाळी दिलेले आश्वासन फुग्याप्रमाणे सायंकाळी फुटते. पतसंस्था सभासदांच्या हितासाठी आणि सन्मानासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून मला विजयी करावे असे आवाहन पॅनल व्यतिरिक्त असलेले एकमेव उमेदवार दिवाकर वाघमारे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.
पतसंस्थेच्या इतर मागासवर्गीयांच्या सर्वसाधारण गटातून ते निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या विरोधात समता पॅनलचे अविनाश कविराजवार व सोसायटी बचाव पॅनलचे टारझन सुरजागडे आहेत.
प्रश्न : एकट्याने उभे राहण्याचा निर्णय कसा काय घेतला.
उत्तर : सेवानिवृत्तीला पाच वर्षाचा कार्यकाळ शिल्लक राहिला आहे. कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात पतसंस्थेच्या माध्यमाने शिक्षकांना सेवा द्यावी हा उद्देश आहे. उमेदवारीसाठी एका पॅनलकडे आग्रह धरला होता. उमेदवारी नाकारली. स्वीकृत सदस्याचे ‘गाजर’ दाखविले. नाकारले. काहीही होवो. निवडणुकीच्या मैदानात उतरायचे. मतदारांपर्यंत पोहोचायचे. मतदान करण्याचा आग्रह करायचा. या हेतूने निवडणुकीत एकट्याने उतरलो आहे.
प्रश्न : दोन्ही पॅनलच्या उमेदवारांचा सामना कसा कराल.
उत्तर : माझी लढत अविनाश कविराजवार यांच्या समवेत आहे. तेच माझे स्पर्धक आहेत. टारझन सूरजागडे हे मागील कार्यकाळात संचालक होते. ते आता पंचायत समिती गडचिरोली येथे कार्यरत आहेत. अहेरी, एटापल्ली, भामरागड पंचायत समिती व्यतिरिक्त अन्य पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक उमेदवाराला शिक्षक मतदार नाकारणार असल्याचे स्पष्ट लक्षात येत आहे. टार्जन सुरजागडे गडचिरोली येथे वास्तव्याने आहेत. तेथून स्थानिक शिक्षक मतदारांना सेवा देण्याची शक्यता नाही. म्हणून माझी सरळ-सरळ लढत अविनाश कविराजवार यांच्या सोबत होणार आहे.
प्रश्न : एकट्याने प्रचाराच्या स्थितीचा सामना कसा कराल.
उत्तर : निवडणुकीच्या रिंगणात एक असलो तरी शिक्षक मतदारांचा आवाज उठवण्यासाठी सक्षम आहे. प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शिक्षक मतदार भेटीगाठीसाठी बोलवत आहे. सकारात्मक आहेत.यामुळे सामना करणे खूप सोपे आहे.
प्रश्न : प्रचारासाठी कोणत्या साधनांचा वापर करता.
उत्तर : शाळा संपल्यानंतर दुचाकी वाहनाने प्रचारासाठी निघत आहे. केवळ डमी मतपत्रिका सोबतीला असते. प्रत्येक शिक्षक मतदारांच्या घरी जाऊन मी माझी भूमिका मांडत आहे. आग्रह धरत आहे. तीनही तालुके 11 दिवसात पूर्ण करावयाचे आहेत. मिळेल तेवढा वेळ या तीनही तालुक्यासाठी देऊन विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे.
प्रश्न : बाहेरील मतदारांपर्यंत कसा संपर्क कराल.
उत्तर : एकटा आहे. प्रचार करताना चांगली दमछाक होत आहे. अन्य तालुक्यातील उमेदवारांपर्यंत पोहोचणे शक्य होईल असे वाटत नाही. यामुळे मोबाईलद्वारे बाहेरील मतदारांशी संपर्क साधत आहे.
16 मार्च 2025 ला होऊ घातलेल्या पतसंस्थेच्या निवडणुकीबाबत दिवाकर वाघमारे प्रचंड आशावादी दिसले. दोन उमेदवार त्यांच्या विरोधात असले तरी विजयाची त्यांना आशा आहे. शिक्षकी पेशात येण्यापूर्वी आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या सचिव पदावर त्यांनी कार्य केले आहे. संस्थेचा त्यांना चांगला अनुभव आहे. म्हणून मला निवडून द्या असा आग्रह ते शिक्षक मतदारांपुढे धरतात.
