भामरागड : चोरवाटा, अपुरे पोलीस बळ, पोलिसांना योग्य माहिती न मिळणे, वेळेप्रसंगी दुर्लक्ष इत्यादी कारणांमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात दारू येते. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया राज्याच्या या तीन जिल्ह्यातून दारू येते. दक्षिण गडचिरोली परिसरात तेलंगणा व छत्तीसगड येथून दारू येते. तर उत्तर गडचिरोली परिसरात भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून व छत्तीसगड येथून दारू येते. अवैद्यरीत्या दारू येण्याचा प्रकार सगळ्यांनाच अंगवळणी पडला आहे. थांबविणे कठीण आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत छत्तीसगड व तेलंगणाची दारू दुय्यम दर्जाची असते. असा मद्यपींचा युक्तिवाद आहे. ‘शौक’ मुळे स्थानिक मद्यपिंनी ही दारू ‘गोड’ केली आहे.
स्थानिक मद्यपिंची अगतिकता लक्षात घेता आरोग्यास घातक दारू तयार करून मद्यपींना मरणाच्या दारात ढकलण्याचा प्रयत्न धर्मा रायकडून झाला. भामरागड तालुक्यात असलेल्या पण अहेरी तालुक्याच्या सीमेवरील कुडकेली जंगल परिसरात धर्मा राय याने बनावट दारूचा कारखाना सुरू केला. 1200 किलोमीटर दूरवर असलेल्या धुळे जिल्ह्यातील माणसे बोलावून धर्मा रॉय दारू तयार करीत होता. धर्मा रॉय अवैद्य दारूच्या व्यवसायात मुरलेला आहे. 25 वर्षापासून तो हा व्यवसाय करतो. बनावट दारू कारखाना निर्माण करण्यापर्यंत वाढलेली हिम्मत सर्वांना चकित करणारी आहे.
घोट परिसरात बनावट दारू बनविल्या जात असल्याची चर्चा दहा वर्षांपूर्वी होती. खात्री झाली नव्हती. कुडकेलीच्या जंगलात सापडलेला कारखाना स्थानिक परिसरातील बनावट दारूवर शिक्कामोर्तब करीत आहे. कुडकेली परिसर नक्षलग्रस्त आहे. गावाच्या दरम्यान बऱ्यापैकी पाणीसाठा असलेली बांडिया नदी वाहते. दुर्गम भाग, उपलब्ध पाणीसाठा यातून धर्मा रॉय याने कुडकेली परिसरात बनावट दारूचा कारखाना उभारला असला तरी 14 मे 2025 ला पोलिसांनी कारखाना पकडला. धाडसी कारवाई केली. 40 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यात 13 लाखाचे घातक स्पिरिट आहे. स्पिरिटचा वापर करून धर्मा रॉय लोकांचे जीव घ्यायला निघाला होता. हे स्पष्ट झाले आहे.
अवैद्य दारूच्या व्यवसायात धर्मा रॉय मुरलेला आहे. मध्यंतरीच्या काळात पोलीस विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना तो जुमानत नव्हता. स्थानिक परिसरात दिवसाढवळ्या दारूचा पुरवठा करायचा. पैसा पेरून ‘किंग’ झाला होता. पोलीस विभागातील चांगल्या अधिकाऱ्यांमुळे त्याच्यावर पाच वर्षांपूर्वी कारवाई झाली. चामोर्शी येथील त्याचे घर जमीनदोस्त करण्यात आले होते. त्याच्या नातेवाईकांनी आकांत मांडला होता. त्या कारवाईने धर्मा रॉय हादरला होता. काही वर्षापासून शांत होता. बनावट दारू कारखान्याच्या माध्यमाने त्याने पुन्हा डोके वर काढले. बनावट दारू तयार करून लवकरच कोट्याधीश व्हायचा त्याचा ‘गेम’ पोलिसांनी उधळला. यात धर्मा रॉय यांनी तयार केलेला बनावट दारू कारखाना सर्वांनाच चकित करणारा आहे.
बनावट दारू कारखाना पकडणे ही सामान्य बाब नाही. बनावट दारूमुळे देशात कित्येक लोकांचे बळी जातात. अशी प्रकरणे नियमितपणे चर्चेत येतात. अनेकांचे जीव गेलेले असताना धर्मा राय कडून बनावट दारूचा कारखाना उभारल्या जात असेल तर त्याच्यावर जबर कारवाईची गरज आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

