नियम डावलून निळ्या नवीन बसेस शहराकडे !
अहेरी : विविध कारणाने राज्य परिवहन महामंडळाचा अहेरी आगार नेहमीच चर्चेत असतो. या आगाराला चार महिन्यापूर्वी मानव विकास मिशन कडून 25 नवीन बसेस मिळाल्या. या बसेस स्थानिक पातळीवर वापरायच्या आहेत. या विषयीचे स्पष्ट निर्देश मानव विकास मिशन आयुक्त औरंगाबादकडून आहेत. स्थानिक पातळीवर जुन्या आणि भंगार बसेस व शहराकडे नवीन बसेस असा प्रकार अहेरी आगाराकडून सुरू आहे. ब्रेक फेलच्या घटनेला अहेरी आगारच जबाबदार आहे. नवीन बसेस या मार्गावर पाठविल्या असत्या तर हा प्रकार घडला नसता अशी प्रतिक्रिया मानव विकास मिशन कार्यक्रमाची जाण असलेले व्यक्त करीत आहेत.
गुड्डीगुडम ते मोसम दरम्यान दि. 19 मे 2025 ला अहेरी येथून सिरोंचाकडे जाणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाले ही बाब चालकाच्या लक्षात येतात त्याने बसमधील प्रवाशांना सावधान राहण्याची सूचना दिली. यावेळेस 81 प्रवासी प्रवास करीत होते. 6 किलोमीटरच्या प्रवासात चालकाने बसच्या गतीवर नियंत्रण मिळविले. मोठा अपघात टळला. गुड्डीगुडम ते मोसम या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असल्याने येथे कोणत्याही वाहनाची गती अत्यंत कमी असते. यामुळेही चालकाला बसच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले. हाच प्रकार दुसऱ्या रस्त्यावर असता तर निश्चितच दोन-चार प्रवाशांचे बळी गेले असते.
शाळा संपल्या. मानव विकास मिशनच्या बसेस दोन महिन्यासाठी मोकळ्या झाल्या. या बसेसच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाचा गल्ला भरता येते. हा हेतू ठेवून मानव विकास मिशनच्या नवीन बसेस सर्रासपणे चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, वर्धा, नागपूर इत्यादी मार्गावर पाठविण्यात येत आहे. तर दुसरीकडे स्थानिक परिसराच्या अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा तालुक्यात भंगार व जुन्या बसेस पाठवून प्रवाशांना अहेरी आगार मरणाच्या खाईत ढकलत आहे.
ब्रेक फेल होणे किंवा प्रवासात बस खराब होणे ही घटना स्थानिक परिसरात नवीन नाही. मानव विकास मिशनच्या निळ्या बसेस अहेरी आगाराला प्राप्त झाल्या असल्या तरी या बसेसचा वापर ग्रामीण भागात करण्यात अहेरी आगार सपशेल अपयशी ठरला आहे. आगाराचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा अहेरी आगाराचा हेतू यात दिसून आहे. असे असले तरी मानव विकास मिशनच्या नियमांची पायमल्ली अहेरी आगाराकडून होत आहे. मानव विकास मिशन कडून प्राप्त झालेल्या बसेस पूर्णपणे मुलींना ये-जा करण्यासाठी आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा या बसेस जलद प्रवासासाठी वापरता येत नाही. स्थानिक पातळीवरच या बसेसचा वापर करायचा आहे. या विषयाची माहिती फार कमी लोकांना असल्याने अहेरी आगाराच्या या प्रकारावर कुणीच आक्षेप नोंदवित नाही. यामुळे अहेरी आगार निर्ढावला आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी लक्ष घालून या प्रकारावर वचक निर्माण करणे अत्यावश्यक आहे.

