एटापल्ली : गडचिरोलीच्या नवेगाव येथील उच्चभ्रू वसाहतीत दि. 13 एप्रिल 2025 ला सेवानिवृत्त अधीक्षिका कल्पना केशव उंदीरवाडे यांची हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या करण्यात आलेल्या हत्येत विशाल ईश्वर वाळके वय 35 वर्ष याला अटक करण्यात आली. विशाल ईश्वर वाळके हा एटापल्ली येथील आहे. कामानिमित्याने तो गडचिरोली येथे वास्तव्यास होता. आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी त्याने कल्पना उंदीरवाडे यांची हत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. विशाल ईश्वर वाळके याला गडचिरोली पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले असून त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.
विशाल वाळके याचेवर पोलीस स्टेशन एटापल्ली येथे आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल आहे. खटला न्यायप्रविष्ट आहे. आदिवासी विविध कार्यकारी संस्था हेडरी येथे तो सचिव म्हणून कार्यरत होता. या संस्थेत आर्थिक अपहार केला होता. यावरून पाच वर्षांपूर्वी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
चंद्रपूर रस्त्यावर नवेगाव येथील पेट्रोल पंपाच्या मागे उच्चभ्रू नोकरदार वर्गाची कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये कल्पना केशव उंदीरवाडे या वास्तव्याने होत्या. त्यांचे पती केशव उंदीरवाडे यांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. केशव व कल्पना उंदीरवाडे यांना अपत्य नसल्याने त्यांनी एका मुलाला दत्तक घेतले. दत्तक मुलासह त्या आपल्या घरी रहात होत्या. विशाल ईश्वर वाळके एट्टापल्ली वय 35 वर्ष हा कामा निमित्ताने गेल्या दोन वर्षापासून गडचिरोली येथे राहत होता. कोणतेही सक्षम कामे नसल्याने तो बेरोजगार अवस्थेतच होता. कौटुंबिक वादातून त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. एका मुलासह त्याची आई त्याच्यासोबत गडचिरोली येथे राहत होती. विशाल आई व मुलगा असे तिघेजणे कल्पना उंदीरवाडे यांच्याकडे किरायाणे वास्तव्यास होते. विशाल वाळके याच्या हाताला सक्षम काम नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून त्याने घरभाडे कल्पना उंदीरवाडे यांना दिले नव्हते. घरभाडे संदर्भात कल्पना उंदीरवाडे यांनी विशाल वाळके याला हटकले असता त्याला वाईट वाटले. यामुळे वाळके तो उंदीरवाडे यांच्याबाबत राग मनात धरून होता. यातच विशाल वाळके आर्थिक विवंचनेत होता. कोणतेही उत्पन्नाचे सक्षम साधन नव्हते. कल्पना व पती केशव उंदीरवाडे हे दोघेही शासकीय नोकरीत असल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. सधन परिस्थिती होती. कल्पना उंदीरवाडे यांच्या तब्येतीची चौकशी करण्याच्या बहाण्याने दिनांक 13 एप्रिल 2025 ला विशाल वाळके त्यांच्या घरी गेला. यावेळेस संधी साधून कल्पना उंदीरवाडे यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केला. खून केल्यानंतर विशाल वाळके घाबरून गेला. यावेळेस कल्पना उंदीरवाडे यांच्याकडे सोनसाखळी घेऊन आजूबाजूला फिरत राहिला. दुसऱ्या दिवशी चामोर्शी येथील एका सराफा व्यापाऱ्याला सोनसाखळी विकली. स्वतःला निरपराध असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. कल्पना व केशव उंदीरवाडे यांनी दत्तक घेतलेला मुलगा या दिवशी वैरागड येथे प्रात्यक्षिक परीक्षेसाठी गेला होता.
दिवसाढवळ्या झालेल्या हत्येची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली होती. विविध बाजूने तपास सुरू होता. वेगवेगळ्या व्यक्तींकडून माहिती घेण्यात येत होती. आरोपींचा शोध घेणे गडचिरोली पोलिसांसमोर आव्हान झाले होते.
पोलिसांच्या तपासा दरम्यान विशाल वाळके याची भूमिका संशयास्पद होती. आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये तपासणी केली असता विशाल वाळके हत्येच्या वेळा दरम्यान घराच्या आजूबाजूला फिरत असल्याचे लक्षात आले. यावरून पोलिसांचा संशय बळावला. विशाल वाळकेला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता विशाल वाळकेने गुन्हा कबूल केला. पाच दिवसातच गडचिरोली पोलिसांनी आरोपीचा छडा लावला.

