‘टॉवर आहे गावाला, रेंज नाही नावाला’
पेरमिली : निसर्गाच्या कुशीत लपलेले गाव म्हणून पेरमिली परिसरात ताडगुडा या गावाची ओळख आहे. पेरमिली येथून आठ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. डोंगरदऱ्यात वसलेले गाव असल्यामुळे या गावात कोणत्याही भ्रमणध्वनी कंपनीने आपली सेवा दिली नाही. ही बाब ओळखून जिओ नामक कंपनीने येथे दोन वर्षापूर्वी टावर उभारले. दोन वर्षांपूर्वीच टॉवरचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या कंपनीने अद्याप आपली सेवा स्थानिक परिसरातील नागरिकांसाठी सुरू केलेली नाही. ‘टॉवर आहे गावाला, रेंज नाही नावाला’ अशी स्थिती या जिओ टावरची झाली आहे.
याचा प्रभाव या परिसरात काम करणारे विविध विभागाचे कर्मचारी, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांवर पडत आहे. येथे कोणत्याच कंपनीचे नेटवर्क नाही. जिओकडून टावर तर उभारले. पण सुरू केले नाही. मोबाईल नेटवर्कची किती दिवस वाट पाहायची हा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.
जिओ या खासगी कंपनीने सेवा देण्यास सुरुवात केली नसल्याने या संदर्भात कुणाकडे तक्रार करायची याची कल्पना स्थानिक नागरिकांना नसल्याने स्थानिक नागरिक नेटवर्कच्या एक-दोन दांडी साठी डोंगरावर, झाडावर चढून कसा तरी संवाद साधत असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.
ताडगुडा, कोरेपल्ली, चिरेपल्ली अशी विविध गावे या परिसरात आहेत. या गावांना गेल्या अनेक वर्षापासून मोबाईल सेवेचा लाभ होत नाही. भारत दूरसंचार निगम कडून देण्यात येणारी सेवा निकृष्ट दर्जाची असल्याने गावकरी आपुलकीचे दोन शब्द सुद्धा आप्तस्वकीयांशी बोलू शकत नाही. यावरचा पर्याय म्हणून जिओ टावरची निर्मिती करण्यात आली. टॉवरचे काम पूर्ण झाले. अडले कुठे हे समजायला मार्ग नाही. गेल्या दोन वर्षापासून टावर सुरू करण्याचा कोणताही प्रयत्न जिओ या खाजगी मोबाईल कंपनीकडून करण्यात आला नाही. नेमके घोडे कुठे अडले आहे हे सांगायला कोणीच तयार नाही. इंटरनेट व मोबाईल नेटवर्क लाभ घ्यायचा असल्यास जनतेला आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन इंटरनेट व मोबाईल सेवेचा लाभ घ्यावा लागतो. मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी या परिसरात जिओ ही खासगी कंपनी सेवा देण्यास तत्पर नसल्याचे दिसते आहे.
टावर उभारणारी कंपनी ही खाजगी स्वरूपाची कंपनी असल्याने या कंपनीचा मोबाईल नेटवर्क संदर्भात शासनाची करार झाला असल्याने शासनाने या समस्येची दखल घेऊन ताडगुडा येथील जिओचे टावर सुरु करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

