देचलीपेटा-जीमलगट्टा रस्त्या दरम्यानचा प्रकार
देखभाल व दुरुस्ती कडे दुर्लक्ष
अहेरी : मागील आर्थिक वर्षात देचलीपेटा-जीमलगट्टा या 18 किलोमीटरच्या रस्त्याचे काही प्रमाणात बांधकाम करण्यात आले. शेडा आणि सिंदा या दोन गाव दरम्यान करण्यात आलेल्या रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याने अवघ्या आठ महिन्यातच रस्त्याचा ‘बँड’ वाजला असून रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
शेडा आणि सिंदा या दोन गावादरम्यान करण्यात आलेले बांधकाम 6 किलोमीटरचे आहे. गडचिरोलीच्या चन्नावार नामक कंत्राटदाराने हे काम केले आहे. मागील आर्थिक वर्षात पावसाळा लागण्यापूर्वी कंत्राटदाराने हे काम केले होते. बांधकामाला फक्त 6 महिन्याचा कालावधी उलटला आहे. पावसाळा आटोपताच ऑक्टोंबर-नोव्हेंबर दरम्यान रस्ता खराब व्हायला सुरुवात झाली. आता तर पाच-दहा फुटावरच मोठमोठे खड्डे पडले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर रस्ता खराब व्हायला सुरुवात झाली. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला आलापल्लीचे याकडे लक्ष नाही.
देचली, पेठा, कल्लेड, कोन्जेड, बिराडघाट, कम्मासुर व अन्य दुर्गम भागांना जोडणारा हा रस्ता आहे. झिंगानूर, सोमनपल्ली, असरअलीकडे जाणारी बरीचशी वाहने या मार्गाने जाणे-येणे करतात. या रस्त्यावर नियमित वाहतूक असते. बांधकाम करताना कंत्राटदाराने रस्त्याचा दर्जा टिकवून ठेवणे गरजेचे होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता बांधकाम करताना काळजीपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे होते. असे मात्र झाले नाही. 2 टक्के घेण्याच्या नादात सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याकडे दुर्लक्ष केले. कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले. अवघ्या 6 महिन्यातच रस्त्याचा बँड वाजला.
नवीन नियमावलीनुसार रस्ता बांधकाम केल्यानंतर पाच वर्षापर्यंत देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराची असते. यासाठी काही रक्कम संबंधित विभाग राखून ठेवत असतो. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी कंत्राटदाराला कामात लावले नाही.
अहेरी या तालुका स्थळापासून 70 किलोमीटरच्या जवळपास हा रस्ता आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्याकडे फिरकत सुद्धा नाही. यामुळे कंत्राटदार रस्ता बांधकाम करताना मनमर्जीने काम करतात. रस्त्याचा दर्जा ढासळून टाकतात असे स्थानिक नागरिकांचे मत आहे.

