अवघड क्षेत्रात महिला शिक्षकांची नियुक्ती करा
नागेश मडावी यांची मागणी
अहेरी : गडचिरोली जिल्ह्याची दुर्गम व अतिदुर्गम परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने दिनांक 18 जून 2024 च्या निर्णयान्वये सर्वसाधारण आणि अवघड अशा दोन भागात जिल्ह्याची विभागणी केली आहे. करण्यात आलेल्या विभागणीमुळे जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेला शिक्षक वर्ग सर्वसाधारण क्षेत्रात सेवा देण्यास उत्सुक आहे. अवघड क्षेत्रात जाण्यास नकार देतो. महिला शिक्षिका तर तालुका मुख्यालयाच्या आजूबाजूला सेवा देतात. दुर्गम भागात सेवा देणाऱ्या महिला शिक्षकांची संख्या अत्यल्प आहे. येत्या जूनमध्ये जिल्हा परिषद गडचिरोलीच्या बदल्या होणार आहे. कुकामेटा आणि भामरागड येथील विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण लक्षात घेता अवघड क्षेत्रात सुद्धा महिला शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी यांनी केली आहे.
मागील एक वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडून कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात आली. या भरतीमध्ये बहुतेक शिक्षक पुरुष आहेत. नियुक्ती करताना मोठ्या शाळांना प्राधान्य देण्यात आले. तेथे त्यांची नियुक्ती करण्यात आली. लहान शाळा तशाच राहिल्या. आजूबाजूच्या दोन-तीन शाळा मिळून एका शाळेवर कंत्राटी महिला शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुकामेटा व समूह निवासी शाळा भामरागड येथे पंधरवड्यातच दोन अल्पवयीन मुलींचे अत्याचार प्रकरण पुढे आले. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या दोन्ही घटना आहेत. भामरागड सारख्या दुर्गम तालुक्यातील मुलीसुद्धा सुरक्षित नाही हे यावरून स्पष्ट होते. मुलींच्या सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना शाळांमध्ये करण्यात आल्या नाही. महिला समित्यांकडून नियमित तपासण्या होत नाही. पुरुष अधिकारी तेवढे जातात तपासण्या करतात. या तपासण्याबाबत साशंकता आहे. सगळा घोळ आहे.
कुकामेटा आणि भामरागड येथील प्रकरणे पुढे आले असले तरी यापेक्षा जास्त प्रकरणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगाऊच्या चौकशी मागे लागतात म्हणून पालक पुढे येत नाही. अशा स्थितीत महिला शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला महिला शिक्षकांमुळे प्रतिबंध बसू शकतो. शालेय मुलींचे भवितव्य सुरक्षित आणि उज्वल करण्यासाठी दुर्गम आणि अती दुर्गम भागात महिला शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी.सोबतीला कंत्राटी शिक्षिका सुद्धा देण्यात याव्या अशी मागणी नागेश मडावी यांनी केली आहे.
