अहेरी : सिरोंचा तालुक्याच्या दर्शेवाडा येथील 31 वर्षीय युवक अश्विन मलया दुर्गे याने राज्यसेवा परीक्षा मंडळाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत बाजी मारली. पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्याची निवड झाली आहे.
सध्या तो जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत आहे.
राष्ट्रीय मानव अधिकार संघटन नवी दिल्ली व टुडे इंडिया न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने उपविभागीय कार्यालय अहेरी येथे त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला.
आयोजित सत्कार सोहळ्याला सेवानिवृत्त प्राचार्य रतन दुर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नागेश मडावी, राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे पदाधिकारी जावेद अली, महेश अलोने, सुरेश दुर्गे इत्यादींची यावेळेस उपस्थिती होती.
बारमाही प्रवासाची अडचण असलेल्या दर्षेवाडा येथील अश्विन दुर्गे याने शहापूर जिल्हा भंडारा येथून बी.ई. सिविल मध्ये पदवी घेतली. यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तयारीसाठी तो नवी दिल्ली येथे गेला. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत तो दर्शेवाडा येथे पुन्हा परत आला. आर्थिक परिस्थिती अभावी दिल्लीला जाणे पुन्हा शक्य नसल्याने बहिणीकडे गडचिरोली येथे राहून त्याने महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा मंडळाच्या परीक्षांची तयारी केली. 2022 मध्ये त्याने पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा दिली. 2024 ला या परीक्षेचा निकाल आला. यात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. येत्या काही दिवसात तो प्रशिक्षणासाठी जाणार आहे.
अश्विन दुर्गे याचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमीक शाळा दर्शेवाडा येथे झाले. जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिरोंचा येथे 5 ते 12 वर्गापर्यंत झाले. यानंतर त्याने बी.ई. केले. 2019 ला वडिलांचे निधन झाले. घरी केवळ तीन एकर शेती असताना परिस्थितीशी संघर्ष करून अश्विन दुर्गे पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत पोहोचला आहे.
यावेळेस बोलताना तो म्हणाला की, पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा अर्ज भरताना सिरोंचा आणि अहेरीकडे जाणारा रस्ता पुरामुळे बंद होता. तब्बल 30 किलोमीटरच्या वर डोंगरदऱ्या पार करून उमानूर पोहोचलो. पोलीस उपनिरीक्षक पदाचा अर्ज भरला.
निश्चित ध्येय आजच्या विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. सोबत जिद्द, चिकाटी, मेहनत ह्या सगळ्या गोष्टी बाळगल्या तर यश नक्कीच मिळते. अहेरी उपविभागातील परिस्थिती आजही बिकट आहे. युवकांनी परिस्थितीला दोष देऊ नये. संघर्ष करावा. अहेरी उपविभागाचा युवक निश्चितच पुढे जाण्यासाठी पात्र आहे असे तो म्हणाला.
