अहेरी : जिल्हा परिषद पतसंस्था अहेरीची निवडणूक कसलेल्या राजकारण्यांसारखी होताना दिसत आहे. राज्याच्या राजकीय आरोपाचे संदर्भ घेऊन मैदानात उतरलेले दोन्ही पॅनल एकमेकांवर आरोप करताना प्रचलित शब्दांचा वापर करीत आहेत. यात,’खोके, बोके, ओक्के ‘ या शब्दाने शिक्षकांच्या विविध व्हाट्सअप ग्रुप वर चांगलीच रंगत निर्माण केली आहे.
मध्यंतरीच्या काळात राज्याचे राजकीय चित्र बदलले. शिवसेना फुटली. फुटलेले विधानसभा सदस्य गुवाहाटीला गेली. यातून शिंदे सेना तयार झाली. या चित्रावर आरोप होताना ‘खोके’ हा शब्द प्रचलित झाला. गेल्या एक-दोन दिवसापासून भोसले उर्फ खोक्या या व्यक्तीच्या संदर्भात ‘बोक्या’ हा शब्द दूरचित्रवाणीवर चांगलाच गाजत आहे. आणि मध्यंतरीच्या काळात ‘ओक्के’ या शब्दावर भर देऊन त्याला प्रचलित केल्या गेले.
पतसंस्थेच्या प्रचारात रंगत निर्माण व्हावी. मतदारांवर व्हाट्सअप पोस्ट चा प्रभाव पडावा. यासाठी दोन्ही पॅनल विविध व्हाट्सअप पोस्ट तयार करत आहेत. व्हाट्सअप वर पोस्ट करीत आहेत. यात ‘खोके-बोके -ओक्के’ या शब्दाचा वारंवार वापर करीत असल्यामुळे किती खोके, किती बोके, आणि कसे काय ओक्के ही चर्चा शिक्षक मतदारांमध्ये आणि शिक्षकांमध्ये रंगली आहे. पतसंस्थेत झालेला अपहार हा 28 लाखाचा असल्याचे सांगण्यात येते. या अपहराला 28 खोके असे नामाभीधान देण्यात आले. या अपहाराला पाठिंबा देणाऱ्यांना व अपहार करणाऱ्यांना ‘बोक्के’ असे संबोधण्यात येत आहे. अपहार केल्यानंतर शांत बसले म्हणजे ‘ओक्के’ झाले असे सांगण्यात येत आहे.
शिक्षक पतसंस्थेची ही निवडणूक सामान्य राहिली नाही. प्रचाराचे आणि समजून सांगण्याचे सगळे ‘फंडे’ वापरले जात आहे. विद्यमान परिस्थितीत प्रचाराचे प्रभावी ‘फंडे’ मतदारांवर प्रभाव पाडू शकतात. हे अनेक उदाहरणांवरून दिसत आहे. सामाजिक माध्यमांचा आणि विविध आधुनिक तंत्राचा वापर केला तर चित्रसुद्धा बदलविता येते हे अनेकदा दिसले आहे. हे संदर्भ घेऊनच दोन्ही पॅनल मैदानात उतरले आहेत. आणि ‘खोके, बोके, ओक्के ‘ होत आहे.
