प्रतिनिधी
सिरोंचा : अहेरी आगाराकडून उन्हाळ्यात बऱ्याच हंगामी बसेस सुरू करण्यात येतात.यात सिरोंचा-असरली-भोपालपट्टणम अशी एक बस सेवा आहे. फेब्रुवारी महिना आटोपला. मार्च महिन्याला सुरुवात झाली. तरी अहेरी आगाराने ही बस सेवा सुरू केली नाही. ही बस सेवा सुरू करण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
असरली येथून 30 किलोमीटर अंतरावर पातागुडम गाव आहे. तेथून दहा किलोमीटर अंतरावर छत्तीसगडमध्ये येणारे भोपालपट्टणम हे गाव आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी पातागुडमच्या इंद्रावती नदीवर पुलाची निर्मिती झाल्यानंतर अहेरी आगाराकडून सिरोंचा-असरली-पातागुडम-भोपालपट्टम अशी हंगामी बस सेवा सुरू केल्या जात असते. साधारणतः जानेवारी महिन्यात हंगामी बस सेवा सुरू केल्या जाते. यावर्षी फेब्रुवारी महिना आटोपला. मार्च महिना अर्ध्यावर आहे. तरीपण ही बस अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
या मार्गावर मोठी लोकवस्ती असलेले गावे आहेत.यात पेंटिपाका, अंकीसा, असरअली, सोमनपल्ली इत्यादी गावांचा समावेश होतो. सिरोंचा तालुक्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात छत्तीसगड राज्यातील भोपालपट्टणम, तिमेड बिजापूर, जगदलपुर व इतर गावांशी संबंध आहेत. स्थानिक जनता छत्तीसगड राज्यात मोठ्या प्रमाणात प्रवास करीत असते. प्रवाशांना या हंगामी बसचा लाभ होत असतो. या वर्षी अहेरी आगाराने या मार्गावरची बस सेवा सुरू करण्याची तसदी घेतलेली नाही.
तसा हा बारमाही रस्ता आहे. निजामाबाद-जगदलपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 चा हा रस्ता आहे. नेहमीच वर्दळ सुरू असते. खाजगी वाहने सुद्धा येथे मोठ्या प्रमाणावर धावतात. छत्तीसगड राज्यातील खाजगी बसेस सिरोंचा, मंचेरिअल पर्यंत धावत आहेत. रस्त्यांची अडचण नाही. असे असताना येथे हंगामी बस नव्हे तर बारमाही बस पाठविणे आवश्यक असताना अहेरी आगाराकडून फक्त हंगामी बसचे नियोजन केले जाते. हा न समजण्यापलीकडचा प्रकार आहे.
सिरोंचा-भोपालपट्टणम हा हंगामी बसचा विषय बाजूला ठेवण्यात यावा. दिवसातून किमान तीन फेऱ्या या मार्गावर नियमितपणे सोडण्यात याव्या अशी मागणी स्थानिकांची आहे.
