प्रतिनिधी
अहेरी : वस्ती शाळा शिक्षक म्हणून शिक्षकी पेशाची सुरुवात केली. शासनाने घेतलेल्या निर्णयान्वये नियमित झालो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुडेवाही येथे नियुक्ती आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोतुकपल्ली येथे प्रतिनियुक्तीवर आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या जाणून घेता येऊ शकतात. यासाठी पतसंस्था निवडणुकीच्या रिंगणात आहे. प्रतिसाद उत्तम आहे. निवडून येण्याचा विश्वास आहे. असे मत चंद्रकांत गंगाराम कुळमेथे यांनी मांडले.
जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या खुल्या गटातून चंद्रकांत गंगाराम कुळमेथे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात असल्याची अनेक कारणे स्पष्ट केली.
प्रश्न : निवडणुकीत उभे राहण्याचे कारण सांगा.
उत्तर : विविध प्रकारचे कर्ज घेण्याच्या माध्यमातून पतसंस्थेशी वारंवार संबंध आला. शिक्षकांसाठी चांगले काम करण्याचा पतसंस्था चांगला मंच आहे. हे लक्षात आले. पतसंस्थेच्या माध्यमातून शिक्षकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ शकतो. सामाजिक काम करण्याची संधी मिळते. म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे.
प्रश्न : पतसंस्थेच्या अनुषंगाने भविष्यातील उपाययोजना सांगा.
उत्तर : कामानिमित्ताने वारंवार पतसंस्थेमध्ये जात असतो. पतसंस्थेची इमारत बांधली आहे. 6000 स्क्वेअर फिट ची जागा आहे. संरक्षक भिंत बांधलेली नाही. आपण निवडून आल्यानंतर संरक्षक भिंत बांधण्यासाठी प्रयत्न करू. झाडे लावू. प्रसन्न वातावरण तयार करू अशा अनेक उपाययोजना मनात आहेत.
प्रश्न : अनुसूचित जमातीचे मतदार जास्त आहेत. त्यांना आपल्याकडे कसे आकर्षित कराल.
उत्तर : संचालक मंडळाच्या 13 पैकी 5 जागांवर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना रिंगणात उतरवून अनुसूचित जमातीला न्याय देण्याचा प्रयत्न समता पॅनलने केला आहे. हाच मुद्दा अनुसूचित जमातीच्या शिक्षक मतदारांपर्यंत मी घेऊन जात आहे. यालाच समता म्हणतात. हा मुद्दा मतदारांना पटवून सांगत आहे. याचा मला पूर्णपणे लाभ होईल अशी आशा आहे. अनुसूचित जमातीचा शिक्षक असताना मला खुल्या प्रवर्गातून संधी दिली. हे सुद्धा सांगत आहे.
प्रश्न : प्रतिसाद कसा आहे.
उत्तर : प्रतिसाद उत्तम आहे. युवा उमेदवारांना पतसंस्थेच्या कारभारात समाविष्ट करून घेण्याकडे मतदारांचा कल दिसतो आहे. समता पॅनलकडून युवा उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आल्याने समता पॅनलला यश येईल असे वाटते.
प्रश्न : विशिष्ट समुदायाचे पॅनल आहे असा आरोप ऐकिवात आहे.
उत्तर : अनुसूचित जमातीच्या पाच उमेदवारांना संधी दिली. पुन्हा काय अपेक्षित आहे. सर्वच प्रवर्गातील उमेदवार येथे आहेत. यामुळे विशिष्ट समुदायाचा प्रश्न निर्माण होत नाही. सुजाण मतदार आहेत. निश्चितच सकारात्मक मतदान होईल. विरोधी पक्षाकडून रंगाचे राजकारण केले जात आहे. दुपट्टे वाटल्या जात आहे. पतसंस्थेच्या निवडणुकीत दुपट्टे वाटप संयुक्तिक वाटत नाही. विचार वाटावे. शिक्षकांचा फायदा होईल.
प्रश्न : किती उमेदवार निवडून येतील.
उत्तर : 13 पैकी 13 उमेदवार निवडून येतील असे चित्र शिक्षक मतदारांनी निर्माण केले आहे. तूर्तास तरी 13 उमेदवारांच्या विजयाप्रती सकारात्मक आहे. यावेळेस पतसंस्थेवर आमचा झेंडा फडकेल.
चंद्रकांत गंगाराम कुळमेथे करंचा सारख्या दुर्गम गावात वस्तीशाळा शिक्षक म्हणून लागले. शासनाच्या निर्णयान्वये ते नियमित झाले. 10 वर्षाची नियमित सेवा झाली. युवा उमेदवार आहेत. चाळिशीच्या आत आहेत. मोठा कार्यकाळ शिल्लक आहे. जुन्या संचालकांकडून अनुभवाची शिदोरी घेऊन नवीन काहीतरी करण्याची त्यांची इच्छा दिसते. यासाठी ते मतदारांच्या दारापर्यंत फिरत आहेत.
