अहेरी : महाराष्ट्राच्या नकाशावर वर्धा आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे. वर्धा जिल्ह्यात 1975 ला दारूबंदी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात 1993 ला दारूबंदी करण्यात आली. दारूबंदी करण्याची कारणे वेगवेगळी असली तरी छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात दोन्ही जिल्ह्यात दारू येते. पोलीस विभागाला अवैद्य दारूवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. मनुष्यबळाचा अभाव, चोरवाटा इत्यादी कारणांमुळे छुप्या मार्गाने दारू या दोन जिल्ह्यात येत आहे. दोन्ही जिल्ह्यात दारूबंदी असली तरी वर्धा जिल्ह्यात मात्र तीस वर्षावरील व्यक्तीला दोन युनिट दारू बाळगण्याचा अधिकृत परवाना मिळतो. 1975 पासून 2024-25 पर्यंत वर्धा जिल्ह्याच्या 11000 मद्यपींना अधिकृत परवाना मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात ही सोय मात्र नाही. हा दूजाभाव का करण्यात येत आहे ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वर्धा जिल्ह्यात 1975 ला दारूबंदी करण्यात आली. महात्मा गांधी यांचे बरेच वर्ष सेवाग्राम येथे वास्तव्य राहिले. त्यांच्या वास्तव्याने हा जिल्हा पुनीत झाला आहे. त्यांच्या वास्तव्याने पुनीत झाला असल्याने वर्धा जिल्ह्यात दारूबंदी करावी असा सूर तत्कालीन परिस्थितीमध्ये निघाला. राज्य सरकारने यावर अंमलबजावणी केली. वर्धा जिल्ह्यात 1975 पासून दारूबंदी केली. 31 मार्च 1993 पासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली असली तरी नजीकच्या नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यातून मद्यपींना दोन युनिट म्हणजे दोन लिटर दारू आणता येते. जे मद्याच्या आहारी गेले आहेत. ज्यांना मद्यशिवाय जमत नाही. अन्यथा त्रास होतो. अशांनी जिल्हा शल्यचिकित्सकाकडून प्रमाणपत्र घ्यायचे आहे. प्रमाणपत्र नंतर दोन युनिट दारू बाळगता येते. अन्य जिल्ह्यासाठी हा नियम बारा युनिटचा आहे. अधिकृत अर्ज करून केवळ शंभर रुपये भरून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हा परवाना मिळतो. 2024-25 या आर्थिक वर्षात जवळपास 950 च्या वर मद्यपींनी वर्धा जिल्ह्यात परवाने काढले. 1975 पासून हा आकडा यावर्षी पर्यंत 11000 च्या वर पोहोचला आहे. ही सोय गडचिरोली जिल्ह्याला नाही. वर्धा जिल्ह्यासाठी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली असेल तर गडचिरोली जिल्ह्यासाठी ही सोय का उपलब्ध करून देण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. नियम सारखेच असायला पाहिजे. एका जिल्ह्यासाठी वेगळा तर दुसऱ्या जिल्ह्यासाठी वेगळा असे का ? असा प्रश्न मद्यपी उपस्थित करीत आहेत.
वर्धा जिल्ह्यासाठी ही सोय करण्यात आली असली तरी गडचिरोली जिल्ह्यासाठी ही सोय करण्यात आली असल्याचे ऐकिवात नाही. चोरवाटेने दारू आणून पिण्यापेक्षा अधिकृत मार्गाने दारू आणून पिणे योग्य आहे. असा सूर मद्यपीकडून निघत आहे. गडचिरोली जिल्ह्याचे कार्यक्षेत्र प्रचंड मोठे आहे. एका बाजूला छत्तीसगड तर दुसऱ्या बाजूला तेलंगाना आहे. गडचिरोली जिल्ह्याला चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या महाराष्ट्राच्या तीन जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. वर्धा जिल्ह्यासाठी करण्यात आलेला नियम गडचिरोली जिल्ह्यासाठी सुद्धा लागू करावा अशी प्रतिक्रिया मद्यपींकडून व्यक्त होत आहे.
