संगणक खरेदीचे कागदपत्र सार्वजनिक करावे- संजय देशपांडे
अहेरी : पतसंस्थेचा अनेक वर्षापासून सभासद आहे. सेवानिवृत्तीला पाच वर्ष शिल्लक आहेत. पतसंस्थेच्या आमसभांना नियमितपणे हजेरी लावतो. आमसभेत ‘कामकाज कमी-गोंधळ जास्त’ असतो. सामान्य सभासदाच्या मताला वाव देण्यात येत नाही. कुणीच धुतल्या तांदळासारखा नाही. चार संगणक संचाची किंमत आठ लाख होऊच शकत नाही. म्हणून पतसंस्थेत डोकावून पाहण्याची इच्छा निर्माण झाली. समविचारी शिक्षक मतदार एकत्रित आलो. समता पॅनल तयार केले. सर्वानुमते उमेदवार ठरविले. माझ्या नावावर सार्वमत झाले. निवडणुकीच्या रिंगणात आहे. चांगले काहीतरी करता येईल म्हणून निवडणूक लढवीत आहे. जिंकून येईल असा विश्वास आहे.असे मत सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले संजय महादेव देशपांडे यांनी व्यक्त केले. समता पॅनलचे ते उमेदवार आहेत.
प्रश्न : संगणक खरेदी नेमकी काय भानगड आहे.
उत्तर : पतसंस्थेचे काम संगणीकृत व्हावे म्हणून विद्यमान सत्तारूढ मंडळींनी चार संगणक संचाची खरेदी केली. नोकरदार आणि व्यवसायात असणाऱ्या प्रत्येक कुटुंबीयांकडे संगणक संच आहे. ब्रँडेड असो वा असेंबल्ड, प्रत्येकांना संगणक संचाची किंमत माहिती आहे. सुरू जनरेशनचा असेंबल्ड संगणक संच 25 हजारात येतो. डेल, असर, इंटेल या प्रचलित कंपन्यांचा संगणक संच 50 ते 60 हजाराच्या घरात आहे. संस्थेशी संबंधित विशिष्ट प्रोग्राम बनवून संगणक संचात अपलोड करण्यात आले तरी एका संगणक संचाची किंमत दोन लाख होऊ शकत नाही. संगणक संचाचे ज्ञान असलेल्यांना हे चांगलेच माहीत आहे. निश्चितच संगणक संचात खिचडी शिजली आहे. खरेदीची माहिती मागितली तर माहिती दिल्या जात नाही. काही ना काही कारण सांगून टाळाटाळ केल्या जाते. कुठल्याही वस्तूची प्रामाणिक खरेदी झाली असेल तर भीती नसते. संगणक संच सहित सगळ्याच खरेदी-विक्रीचे कागदपत्रे पतसंस्थेच्या मतदारांसाठी सार्वजनिक करायला पाहिजे. ‘कर नाही त्यास डर कशाला’ असे ते म्हणाले.
प्रश्न : तुमच्या पॅनल चा महत्वाचा विषय सांगा.
उत्तर : पतसंस्थेच्या निवडणुकीत युवा उमेदवारांना दिलेले प्राधान्य हाच आमच्या पॅनल चा महत्वाचा विषय आहे. सुधाकर दुर्वा, दिवाकर मादेशी, चंद्रकांत कुळमेथे, रमेश भोयर, श्रीकांत काटेलवार यांच्यासारखे युवा उमेदवार आम्ही पतसंस्थेच्या रिंगणात उतरवले आहेत. युवा खांद्यावर पतसंस्थेची धुरा द्यावयाची आहे. पुढे युवा उमेदवारांना पतसंस्था चालवायची आहे. भविष्याच्या अनुषंगाने पतसंस्थेत युवा उमेदवारांची एन्ट्री महत्त्वाची ठरेल. हाच आमचा महत्त्वाचा विषय आहे. मतदारांपर्यंत जाताना आम्ही यावरच भर देत आहोत. ‘जुनं ते सोनं’ ही संकल्पना आता कालवाह्य ठरली आहे.
प्रश्न : किती उमेदवार निवडून येतील.
उत्तर : पूर्णच उमेदवार निवडून येतील. सर्वसमावेशक पॅनल आहे. निवडणुकीत अनुसूचित जाती/जमाती, विमुक्त भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, महिला गट, आणि सर्वसाधारण गट अशा पाच गटांमध्ये संचालक मंडळ विभागले गेले आहे. प्रत्येकांना प्राधान्य देण्यात आले. आमच्या पॅनलच्या उमेदवारांवर कोणाचाच आक्षेप नाही.उमेदवारी एकतर्फी देण्यात आलेली नाही. जुन्या दोन संचालकांना उमेदवारी देण्यात आली.नऊ उमेदवार नवीन आहेत. मतदारांचा कल नवीन उमेदवारांकडे आहे. त्यांना बदल हवा आहे.
प्रश्न : पॅनलची सत्ता आल्यास अध्यक्ष कोण असेल.
उत्तर : निवड अद्याप करण्यात आली नाही. समन्वय साधून अध्यक्षाची निवड करू. कोणताही वादविवाद नाही. सामाजिक जाणीव असलेला, सभासदांसाठी 24 तास धावून जाणारा व्यक्ती आणि त्या पदावर बसवू.
संजय देशपांडे खुल्या प्रवर्गातून निवडणुकीच्या मैदानात आहेत उमानुर केंद्राचा केंद्रप्रमुख म्हणून प्रभार त्यांच्याकडे आहे.मरपल्ली च्या शाळेवर पदवीधर शिक्षक आहेत. पॅनल आणि स्वतःच्या विजयाच्या आशेने कामाला लागले आहेत.
