आगार प्रमुख अहेरी यांना निवेदन
अहेरी : पदवीचे शिक्षण घेण्याकरिता राजाराम, खांदला, रायगट्टा, फॅशन टोला, सुरयापल्ली या गावातून जवळपास 25 ते 30 विद्यार्थी अहेरी व आलापल्ली येतात. परतीच्या प्रवासात या विद्यार्थ्यांना गोलाकरजी येथे सोडल्या जाते. राजाराम पर्यंत जाण्याची कोणती सोय नाही. तब्बल सहा ते आठ किलोमीटरचा प्रवास करून मुला-मुलींना आपल्या गावाला जावे लागत आहे. 21 व्या शतकात सायंकाळच्या दरम्यान सहा ते आठ किलोमीटरचा पायदळ प्रवास मुले, मुली करतात हे ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल. पण ही वस्तुस्थिती आहे. यावरचा तोडगा काढा. आमच्यासाठी बसची व्यवस्था करा अशी मागणी करणारे निवेदन मुला-मुलींनी आगार प्रमुख अहेरी यांना दिले आहे.
शंकरराव बेजलवार कला वाणीज्य महाविद्यालय अहेरी, राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली व लक्ष्मीबाई आत्राम विज्ञान महाविद्यालय आलापल्ली या तीन महाविद्यालयांमध्ये राजाराम परिसरातील मुली आणि मुले शिक्षण घेण्यासाठी रोज नियमितपणे येतात. आलापल्ली येथे येण्यासाठी सकाळच्या दरम्यान बसची व्यवस्था आहे. महाविद्यालयात पोहोचतात. पण सायंकाळी मात्र मुला मुलींना घरी पोहोचण्यासाठी अहेरी आगाराने कोणतीच व्यवस्था केली नाही. विद्यार्थिनींना वाऱ्यावर सोडले आहे. अहेरी येथून सायंकाळच्या दरम्यान रेपनपल्लीकरिता बस सोडली जाते. ही बस या विद्यार्थ्यांना गोलाकरजी येथे सोडून देते. रेपनपलीकडे जाते. गोल्लाकरजी ते राजाराम हे फक्त सहा किलोमीटरचे अंतर आहे. सदर बस गोलाकरजी येथून राजारामकडे न्यावी. विद्यार्थिनींना राजाराम येथे उतरवून द्यावे पुन्हा गोलाकरजी मार्गे रेपणपल्ली येथे पाठवावी अशा आशयाचे निवेदन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आगारप्रमुख अहेरी यांना दिले आहे.
