प्रतिनिधी
अहेरी : 2011 ते 2016 या कालावधीत जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीची मी अध्यक्ष होते. माझ्याच कारकीर्दीत पतसंस्थेची येटापल्ली येथे इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मंजूरही झाला. 2016 नंतर कार्यकारणी बदलली. बदललेल्या कार्यकारिणीने आपल्या कार्यकाळात एटापल्लीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. बांधकामाच्या देखरेखीसाठी सहा सदस्यांची बांधकाम समिती गठित करण्यात आली होती. सहा सदस्यांची बांधकाम समिती गठित करण्यात आल्यानंतर एकटे वेलादी कसे जबाबदार आहेत. संपूर्ण बांधकाम समिती जबाबदार आहे. यावर वेलादींनी अनेकदा आक्षेप घेतला होता. पण अन्य सदस्यांनी त्यांचा आक्षेप ऐकून घेतला नाही. परिणामी बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले. आपली चूक लपवण्यासाठी विश्वनाथ वेलादी यांना जबाबदार धरले जात आहे असे त्यांनी सांगितले
जिल्हा परिषद सहकारी पतसंस्था अहेरीची निवडणूक दिवसेंदिवस रंगात येत आहे. होळीच्या पूर्वीच आरोपांचा रंग उधळल्या जात आहे. आपल्या पॅनलचा युक्तिवाद करताना दोन्ही पॅनलच्या सभासदांकडून आपल्या पॅनलची बाजू सावरण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट लक्षात येत आहे.
सोसायटी बचाव पॅनलचे यमाजी मुंजनकर यांनी विश्वनाथ वेलादी यांना जबाबदार धरले असता त्यांची बाजू घेताना पतसंस्थेच्या जुन्या जाणत्या संचालिका वनिता कन्नाके यांनी आपले मत व्यक्त केले.
प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना 2016 ते 2025 या नऊ वर्षाच्या कालावधीवर त्यांनी टीकास्त्र सोडले. एटापल्लीच्या इमारतीची सविस्तर हकीकत त्यांनी सांगितली.
पतसंस्थेची मी अध्यक्ष असताना एटापल्ली येथील सभासदांना पतसंस्थेच्या कामकाजात सहभागी होणे सोपे व्हावे. कर्ज व इतर सर्व गोष्टी एटापल्ली येथून उपलब्ध व्हाव्या. यासाठी एटापल्ली येथे इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तीस लाख रुपयाच्या निधीला मंजुरी सुद्धा देण्यात आली. कार्यकाळ संपला. नव्याने निवडणुका झाल्या. सोसायटी बचाव पॅनल सत्तेवर आले. मी स्वतः संचालिका म्हणून निवडून आले. मी विरोधी पॅनल मध्ये होते. 32 लाख रुपये किमतीच्या इमारतीची किंमत 62 लाख रुपये करण्यात आली. दुमजली इमारत होती. इमारतीच्या पुढे पोलीस स्टेशन आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दुमजली इमारतीची परवानगी नाकारण्यात आली. फक्त तळ मजला बांधण्यात आला. तीस लाख रुपये ही रक्कम दुमजली इमारतीसाठी मंजूर करण्यात आली होती. तळमजल्याचे बांधकाम क्षेत्रफळ वाढले. किंमत वाढली. असे सोसायटी बचाव पॅनल कडून सांगितल्या जात असले तरी दुमजली इमारतीसाठी 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मग रक्कम वाढण्याचा प्रश्न कुठे निर्माण होतो. आत्ताच वस्तूच्या किमती दुप्पट झाल्या नाही तर त्यावेळेस वस्तूच्या किमती दुप्पट होण्याची शक्यता नाही. मग अतिरिक्त रक्कम खर्च होण्याचे कारण काय ? जास्तीची रक्कम ठेकेदाराला दान देऊन किंमत वाढली असे म्हणता येत नाही निश्चितच गैरव्यवहार झाला आहे. इमारत बांधकामाचा धनादेश अध्यक्ष,सचिव आणि व्यवस्थापकाच्या स्वाक्षरीने देण्यात येत असतो. काम कुठपर्यंत झाले व कसे झाले याची खात्री करूनच धनादेश दिला जातो. निकृष्ट दर्जाचे बांधकाम असताना कोणताही आक्षेप न घेता धनादेश दिला. म्हणजे ‘दाल में कुछ काला है’ असा त्याचा अर्थ होतो असा आरोप त्यांनी केला.
बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये तीन भाडेकरू ठेवण्यात आले होते. या तीनही भाडेकरूंनी बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा पुरावा दिला आहे. इमारत राहणे योग्य नसल्याचे लेखी पत्राद्वारे पतसंस्थेला त्यांनी कळविले आहे. इमारतीमध्ये अनेक त्रुटी आहेत. सांडपाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली नाही. बेसिनचे पाणी मागच्या बाजूला गोळा होते. तेथे साप, विंचूचा वावर असतो. घुशी असतात. शोषखड्डा बनविला. त्याला झाकण नाही. छोटा आहे. लवकर भरतो.पुन्हा पाणी रस्त्यावर पसरते.मागच्या बाजूला दाट लोक वस्ती असल्याने लोक शिव्या देतात. या संदर्भात तीनही किरायदारांनी पतसंस्थेशी पत्रव्यवहार केला. यापेक्षा निकृष्ट दर्जाची इमारत असल्याचे दुसरे कोणते उदाहरण देता येईल.
इमारत बांधकाम निविदा एका स्थानिक वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आली. प्रादेशिक वर्तमानपत्रांमध्ये निविदा प्रकाशित केली असती तर स्पर्धा झाली असती. ठरविलेल्या रकमेपेक्षा कमी रकमेच्या निविदा सुद्धा आल्या असत्या. पतसंस्थेची बरीच रक्कम शिल्लक राहिली असती. पण असे करायचेच नव्हते. सचिव जानकीराम पुलगमकर जि. प. शाळा गीताली येथे शिक्षक आहेत. त्यांनी गीताली येथील एका कंत्राटदाराला काम दिले. यामुळे गैरव्यवहाराबाबतच्या अनेक शंका-कुशंका निर्माण होतात.
असे त्यांनी सांगितले.
