अहेरी : निवडणूक चिन्ह वाटप व्हायला अजून पाच दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. मात्र कोणतीही जोखीम पत्करायची नाही असा चंग जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीच्या उमेदवारांनी आणि समर्थकांनी बांधला आहे. दिवसभर शाळा आणि सायंकाळी भेटी-गाठी असा धुमधडाका शिक्षक उमेदवार व समर्थकांनी सुरू केला आहे.
या निवडणुकीत मतदार असलेले जवळपास 70 ते 80 टक्के मतदार अहेरी, आलापल्ली येथे वास्तव्याने आहेत. मतदारांना संध्याकाळचीच वेळ रिकामी आहे आणि उमेदवार व समर्थकांना सुद्धा सायंकाळचीच वेळ सोयीची आहे. यामुळे उमेदवार व समर्थकांनी सायंकाळी भेटी घेण्यावर भर दिला असल्याचे चित्र अहेरी व आलापल्ली येथे दिसून येत आहे.
दिनांक 4 मार्च 2025 पर्यंत नामांकन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. निवडणूक यंत्रणेने ही तारीख निश्चित करून दिली असली तरी या निवडणुकीत सहभागी असलेले सोसायटी बचाव पॅनल आणि समता पॅनल या दोघांचे उमेदवार निश्चित झाले आहे. यामुळे भेटी घ्यायला हरकत नाही. या कारणास्तव समर्थक आणि उमेदवार चांगलेच कामाला भिडले आहेत. आलापल्ली आणि अहेरी च्या विविध प्रभागांमध्ये शिक्षक मतदार वास्तव्याने आहेत. या मतदारांची भेट घेतली तर पुढे सोयीचे होऊ शकते. दिवस जसजसे जवळ येतील तसतशी घाई होण्याची दाट शक्यता असते. मग आत्तापासूनच भेट घेतलेली सोयीची असेल आहे हेतू उमेदवार व समर्थकांचा दिसून येत आहे. दोन-तीन दुचाकी वाहन व सोबत उमेदवार व समर्थक असा ताफा अहेरीच्या प्रत्येक प्रभागातून फिरताना दिसत आहे.
विविध प्रभागातून उमेदवार व समर्थकांचा ताफा फिरताना आढळला की जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेचे महत्त्व या निवडणुकीची माहिती असलेल्यांना लक्षात येत आहे. या निवडणुकीत शिक्षक मतदार असले तरी अहेरी व आलापल्ली हे दोन गाव छोट्या लोकसंख्येचे गाव असल्याने अन्य शासकीय नोकऱ्यांवर असलेले व गावातील राजकीय व सामाजिक घडामोडींमध्ये रस घेणारे या निवडणुकीवर आता चर्चा करायला लागले आहेत.
निवडणुकी संदर्भात निर्माण झालेली विद्यमान परिस्थिती पाहू आता दोन्ही पॅनल नी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसून येते. पतसंस्थेवर आपली सत्ता बसायला पाहिजे यासाठी दोन्ही पॅनल चांगलेच कामाला लागले आहेत. एकंदरीत ही निवडणूक स्पर्धेची आहे. अटीतटीची आहे.
