अहेरी : निवडणुका म्हटलं तर राजकारण आलेच. मग ती कर्मचाऱ्यांची निवडणूक असो वा लोकसभा, विधानसभेची. सगळ्या युक्त्या येथे वापराव्या लागतात. जोडतोड करावी लागते. आश्वासने पूर्ण करता येवोत अथवा न येवो पण ती द्यावी लागतात. पोकळ आश्वासने देऊन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करावे लागते. वेळेप्रसंगी पॅनल सुद्धा बदलावावे लागते. असाच प्रकार जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीच्या निवडणुकीत दिसून येत आहे.
प्राप्त माहितीनुसार तब्बल नऊ वर्षांपूर्वी या पतसंस्थेची निवडणूक झाली होती. चार वर्ष कसे काय वाढले याचे उत्तर आज पतसंस्थेत कोणाकडेच नाही. निवडणुकांचे महत्त्व असलेल्या लोकशाहीला आव्हान देणारा हा प्रकार आहे. नऊ वर्षांपूर्वी पतसंस्थेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत तीन पॅनल तयार झाले होते असे सांगण्यात येत आहे. या निवडणुकीत महेश मडावी यांनी अनुसूचित जाती /जमाती प्रवर्गातून सध्याच्या सत्तारूढ गटाच्या विरोधात असलेल्या पॅनल कडून निवडणूक लढविली. ते जिंकूनही आले. त्यांच्यासोबतच टार्जन सुरजागडे यांनी इतर मागासवर्गाच्या प्रवर्गातून निवडणूक लढविली. ते पण जिंकून आले. पाच वर्षे हे सत्तारूढ गटाच्या विरोधात होते. यावेळेस त्यांनी पॅनल बदलवले. सत्तारूढ गटाने तयार केलेल्या सोसायटी बचाव पॅनल सोबत आपली मोट बांधली आहे. दुसरीकडे विश्वनाथ वेलादी हे सत्तारूढ गटाकडून निवडून आले. यावेळेस च्या निवडणुकीत काय अडचण झाली कुणास ठाऊक. सामान्यपणे सत्तारूढ गटाच्या मागे धावण्याकडे लोकांचा कल असतो पण यांनी मात्र सत्तारूढ गटाची साथ सोडली आणि नव्यानेच तयार झालेल्या समता पक्षाशी मोट बांधली.
या तीन उमेदवारांनी केलेला पॅनल बदल शिक्षकांमध्ये सध्या तरी चर्चेचा विषय झाला आहे. या तिघांचे भवितव्य या पतसंस्थेचे मतदार असलेले 418 शिक्षक मतदार ठरवतील. पण यांनी केलेला बदल कर्मचाऱ्यांच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.
