दिवाकर मादेशी यांचा दावा
अहेरी : जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीच्या निवडणुकीत विमुक्त व भटक्या जमाती गटातून समता पॅनलचे उमेदवार दिवाकर लक्ष्मण मादेशी हे रिंगणात आहेत. निवडणुकी संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. विविध विषयावर त्यांनी आपले मत मांडले. विरोधात दिलेले उमेदवार राजन्ना बिट्टीवार स्पर्धक नाहीत. आपला एकतर्फी विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
प्रश्न : निवडणुकीबाबत काय मत आहे.
उत्तर : निवडणुकीबाबत आपण सकारात्मक आहोत. समता पॅनल कडून आपल्याला उमेदवारी मिळाली आहे. विमुक्त व भटक्या जमाती गटातून दोनच उमेदवार रिंगणात आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार राजन्ना बिट्टीवार माझे स्पर्धक नाहीत. सोसायटी बचाव पॅनलने माझ्या विरोधात कमकुवत उमेदवार रिंगणात उतरविला. एकतर्फी विजयाची चिन्हे आत्ताच दिसायला लागलेली आहेत.
प्रश्न : आपण अतिशयोक्ती करीत आहात असे वाटत नाहीत काय.
उत्तर : यात अतिशयोक्ती करण्याचा काहीच प्रश्न उद्भवत नाही. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना योगदान आहे. उपक्रमशील शिक्षक म्हणून सगळे ओळखतात. विद्यार्थी हितासाठी केलेले काम पाठीशी आहे. सामाजिक जाणिवेतून काम केल्याने निवडणुकीत सुद्धा शिक्षक मतदार सामाजिक जाणीव ठेवूनच मला मतदान करणार आहे. म्हणून एकतर्फी विजयाची आशा आहे.
प्रश्न : पतसंस्थेकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनाने बघता.
उत्तर : पतसंस्थेच्या दृष्टीने सकारात्मक आहे. संस्थेच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची गरज आहे. विद्यमान कार्यकारणी कडून काही उपक्रम राबविले जात असले तरी त्यात व्यापकता आणण्याची गरज आहे. चर्चा केली जाते पण निर्णय घेतल्या जात नाही. गुणवत्ताधारक विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान व सत्कार नियमितपणे करणे आवश्यक आहे. केवळ वही आणि पेन देऊन होत नाही तर परिस्थिती सापेक्ष आवश्यक ती मदत सुद्धा करणे गरजेचे आहे. आपण यासाठी मोठे प्रयत्न करणार आहोत.
प्रश्न : आपल्या मनात असलेल्या उपाययोजना सांगा.
उत्तर : पतसंस्था आतून आणि बाहेरून दोन्हीकडून पोखरलेली आहे. वीस करोडच्या वर आर्थिक उलाढाल असलेली ही पतसंस्था आहे. एक करोड पेक्षा कमी उलाढाल असलेल्या पतसंस्थेसारखी इमारत आहे. इमारतीला संरक्षक भिंत नाही. इमारतीचे सुशोभीकरण करण्यात आलेले नाही. रंग उडाला पण रंगरंगोटी होत नाही. पतसंस्थेच्या माध्यमातून पतसंस्थेच्या मतदारांसाठी आणि शिक्षकांसाठी पतसंस्थेचे एखादी सभागृह असणे आवश्यक आहे. पतसंस्थेचा सभासद आजूबाजूच्या तालुक्यातून अहेरी येथे येतो. मुक्काम करतो. अशा वेळेस त्याच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी दोन खोल्या बांधण्याचा आपण प्रयत्न करू. शिक्षकांच्या निवासाची व्यवस्था व्हावी. त्याला अडचण येऊ नये. हा या मागचा हेतू आहे.
प्रश्न : आपल्या पॅनल कडून आपण अध्यक्ष म्हणून कोणाची निवड कराल.
उत्तर : आम्ही अध्यक्ष अद्याप निवडलेला नाही पण सर्व संमतीने निवडू. कोणताही वाद नाही. सर्व सुरळीत होईल.
प्रश्न : विरोधी पॅनलने निवडलेल्या अध्यक्ष बाबत तुमचं काय मत आहे.
उत्तर : महेश मडावी माझे चांगले मित्र आहेत. आम्ही एका ठिकाणी काम केले आहे. मितभाषी आहेत. अध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव निवडले आहे. त्यांना पुढे करून डाव साधण्याचा काहींचा हेतू दिसतो. अनुसूचित जमातीचा उमेदवार अध्यक्षपदासाठी पुढे करून त्या प्रवर्गातील शिक्षक मतदारांची मते लाटण्याचा हा प्रयत्न आहे.
प्रयोगशील शिक्षक म्हणून दिवाकर मादेशी परिचित आहेत. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंबटपली येथे कार्यरत आहेत. त्यांच्या विविध उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेतली आहे.वैजापूर येथील एका संस्थेकडून त्यांना नुकताच एक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांची हजेरी घेण्याची पद्धत अनोखी आहे. तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंग यांनी त्यांच्या उपक्रमाचे प्रशंशा केली होती. त्यांच्या या उपक्रमाचे अनुकरण पंचायत समिती एटापल्ली, भामरागड पंचायत समितीमध्ये होत आहे.
