राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी च्या बांधकामाचे वास्तव
सिरोंचा : गेल्या दहा वर्षापासून अत्यंत संथगतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी चे काम सुरू आहे. काम रेंगाळण्या संदर्भात विविध कारणे सांगितली जातात. प्रचंड मोठी समस्या घेऊन जनता या मार्गाने जाणे-येणे करते. काम पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत नाही. अशातच चार-पाच किलोमीटरचे काम केले जाते. जनतेची बोळवण केल्या जाते.काम निकृष्ट दर्जाचे आहे. निकृष्ट साहित्याचा वापर या कामांमध्ये करण्यात येत आहे. तूर्तास बामणी पासून कंबलपेठा फाट्यापर्यंत रस्त्याचे खोदकाम करण्यात येत असून येथे गिट्टी पसरविण्यात येत आहे. रस्त्यावर 40 एम एम ची गिट्टी टाकण्यात आली आहे. गिट्टी कमी आणि गिट्टीचा पांढरा भूरकाच जास्त दिसत आहे. जनता या कामाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे. रस्ता बांधकामाच्या प्रक्रियेत सहभागी असलेली सगळी यंत्रणा ‘चोर-चोर मावस भाऊ’ स्वरूपाची असल्याने सगळे काही आलबेल दिसते.
गेल्या दहा वर्षांपूर्वी साकोली-सिरोंचा या चारशे किलोमीटरच्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. 353 सी हा क्रमांकही निश्चित झाला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये या रस्त्याचा समावेश झाला असल्यामुळे रस्ता बांधकामाच्या परवानगी झाल्या. वनसंवर्धन कायद्याची प्रचंड मोठी अडचण वनविभागाने निर्माण केली. यातून कसेबसे काम सुरू आहे. पण कंत्राटदार मोठी मलाई लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बामणी-कंबलपेठा फाट्यापर्यंत मोठ्या टिप्परने भरभरून गिट्टी आणली जात आहे. रस्त्यावर पसरवली जात आहे. टाकण्यात येणारी गिट्टी ४० एम एम ची आहे. रस्ता बांधकामात काळी गिट्टी वापरावी असा स्पष्ट नियम आहे. पण इथे ठिसूळ स्वरूपाची पांढरी गिट्टी वापरली जात आहे. अर्धी गिट्टी आणि अर्धा पांढऱ्या गीट्टीचा भुरका टाकल्या जात आहे. सदरचा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असला तरी या कामावर देखरेख ठेवणारे अभियंते याकडे डोळेझाक करीत आहे. करण्यात येणाऱ्या कामावर निश्चित ‘कमिशन’ अधिकाऱ्यांना मिळत असते. दोन टक्के, पाच टक्के कमिशन घेणे बांधकाम विभागाचा रिवाज आहे. फॅशन झाली आहे. मोठे वेतन असताना सर्रास हा प्रकार सुरू आहे. कमिशनच्या नादात बामणी-कंबलपेटा रस्त्यावर सुद्धा दुर्लक्ष केल्या जाते. परिणामतः येथे बनवला जाणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा होणार आहे. लवकरच रस्ता खराब होईल. पुन्हा खराब रस्त्यानेच जनतेला प्रवास करावा लागेल.
काहीही करा पण रस्ता करा
आलापल्ली-सिरोंचा हा शंभर किलोमीटर चा रस्ता गेल्या दहा वर्षापासून प्रचंड खराब अवस्थेत आहे. प्रवास करणारे वैतागले आहे. रस्त्याच्या कामाची जबाबदारी असलेले याकडे पूर्णता दुर्लक्ष करीत आहेत. कुणालाच जनतेची दया येत नाही. हा रस्ता लवकरात लवकर व्हावा असे प्रत्येकांचे मत आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. याला थांबवणे तूर्तास तरी कठीण आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार आले तरी भ्रष्टाचार थांबवू असे म्हणणारा राजकीय पक्ष भारतात सध्या तरी नाही. यामुळे काम कसे होवो. दोन-चार वर्ष टिकले तरी चालेल, पण झाले पाहिजे अशी उदविग्न प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.
