जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे विचार चांगले असतील कारण काही बाबतीत मला समजतच नव्हते. पण जसं जसे माझे वय वाढतं गेले तसं तसं माझ्या स्वभावात बदल झाला. इतरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत गेला. इतरांची तुलना करायला लागलो. इतर दारू पितात म्हणून मी दारू प्यायला लागलो. इतर काही वाईट सवयी करतात तेच मी करायला लागलो. चांगल्या गोष्टी कमी आणि वाईट गोष्टी जास्त करायला लागलो. जेव्हा माझेकडे पैसा होता तेव्हा मला पैशाची किंमत कळली नाही आणि जेव्हा पैसा अपुरा पडत गेला तेव्हा मी तोच पैसा मिळविण्यासाठी वाटेल त्या स्तरावर जायला लागलो. लोकांप्रमाणे मी काही क्षण 7 नंबर बिडी ओढली. तीन-चार वेळा सट्टा लावून पाहिला. जशी दारू पिली तसेच तीन चारदा गांजा सुद्धा घेऊन पहिला, जेव्हा दहावी बारावीत होतो तेव्हा मी मुलींचा छळ करण्याचा प्रयत्न केला आणि काही क्षणी मी माझ्या स्वार्थासाठी क्षणिक सुखाच्या शोधात भरकटत गेलो. काही वेळा यशस्वी झालो. आणि काही क्षणी यशस्वी झालो. मद्यधुंद अवस्थेत एकदा मी दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध प्रस्थापित केले परंतु ईश्वराच्या कृपेने माझ्या घरी माहीत झाल्यामुळे तेव्हापासून मी दुसऱ्यांदा कधीच प्रयत्न केला नाही. ईश्वराची विशेष कृपा की ए. ए. मध्ये आल्यानंतर कधीच प्रयत्न केला नाही पण आतून मी आजही पांढरा शुभ्र नाही. आजही ते विचार येत असतात पण मी त्यावर देवाला कळकळीची प्रार्थना करतो आणि त्या कृत्यापासून 13 वर्ष होत आहेत देव त्यातून वाचविण्याचाच प्रयत्न करतो. दारू पिण्याच्या काळात मी माझ्या बायकोचे पैसे चोरत होतो आणि दारू पीत होतो. पण मी त्यात फसल्यानंतर घरची चोरी बंद केली आणि दारू पिण्यासाठी भीक मागत होतो. लाचारीचे जीवन जगत असताना मी माझे शरीर खराब झाले, लिव्हर वर सुजन आली आणि मी मरणाच्या दारात पोहोचलो. आज मी मद्यमुक्त असलो तरी मद्यपान काळात जसं मी अफवावर विश्वास ठेवून चुगली आणि निंदा करत होतो आणि आजही ह्या चुका कधी कधी घडतात. कालच आमच्या होमगृप चा 19 वा वाढदिवस होता. त्यानिमित्त काही पाहुणे या समारंभाला बोलावले होते. माझ्यात शंका निर्माण झाली की त्यातील एक पाहुणे असे होते की त्यांना बोलावणे जरुरीचे होते का. ओल्डटायमर सभासदाला विचारून मी समजण्याचा प्रयत्न केला. असो पण ते विशेष अतिथी देवाच्या कृपेने आले नाही आणि मी शांत झालो. मीटिंग चे स्वरूप फक्त एकट्याच्याच विचाराने होत असेल तर त्याला अर्थ आहे का ? हा माझा दुसरा प्रश्न. असे अनेक प्रश्न घेऊन मी स्वतःच गोंधळात पडतो आणि मी माझेच नुकसान करून बसतो. पुढाकार न घेता, हजर न राहता मी अशा अफवा आणि कंड्या पिकवत बसल्यामुळे मी माझे नुकसान करून बसतो आणि तेच आजही करतो. मार्गदर्शकाची मदत न घेतल्यामुळे माझे बरेच अध्यात्मिक नुकसान करून बसतो. ह्या सर्व गोष्टीसाठी एकमेव कारण म्हणजे बारा पायऱ्यांच्या आचरणात जेव्हा माझ्यात सातत्य नसते तेव्हा घडत असतात. भूतकाळात झालेल्या आणि आजही होणाऱ्या चुका ह्या कबूल करण्याचा प्रयत्न खुल्या मनाने करतो. क्षमाशील राहण्यासाठी आणि क्षमा करण्यासाठी मी आजही परमेश्वरासमोर मी प्रामाणिक राहावे यासाठी प्रयत्नशील आहे. जेव्हा मी माझ्या चुका कबूल करतो आणि मी क्षमा मागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माझे हृदय भरून येते आणि मला मानसिक धैर्य प्राप्त होते. सहावी पायरी घेतांना माझी प्रामाणिकता आणि खुले मन जर असेल तर त्याचा मला फायदाच होईल. आज मी कोणासोबत बोलण्याची हिम्मत होत नसेल तरी सुद्धा मी हा अनुभव लिहितो तेव्हा बरेच सभासदांना वाचण्याची संधी प्राप्त होते. माझे दोष आणि दुर्गुण दूर करण्यासाठी हा माझा प्रयत्न. परमेश्वराने माझे दोष शोधण्यासाठी आणि ते काढून टाकण्यासाठी मदत करावी हीच कळकळीची प्रार्थना.
किशोर. एस. एकता समूह, चंद्रपूर.

