तहसीलदारांना निवेदन
सिरोंचा : बांधकाम सुरू झाल्यापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी वादाच्या फेऱ्यात अडकला आहे. जवळपास सगळ्याच राजकीय पक्षाचे पदाधिकारी या कामाच्या प्रगतीवर आणि कामावर शंका-कुशंका उपस्थित करीत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र सरकारकडून या महामार्गाची कोणतीही दखल घेण्यात येत नाही. या महामार्गाचा विषय वाऱ्यावर सोडण्यात आला आहे. आलापल्ली, रेपनपल्ली, उमानुर सारख्या दुर्गम भागातून जाणाऱ्या या महामार्गाकडे केंद्र शासनाच्या संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या तालुका शाखा सिरोंचाकडून नुकतीच या महामार्गाच्या बांधकामाची तक्रार तहसीलदार सिरोंचा मार्फत नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री यांच्याकडे करण्यात आली. तालुका अध्यक्ष श्रीनाथ राऊत यांच्या नेतृत्वात ही तक्रार करण्यात आली. करण्यात आलेल्या तक्रारीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेण्यात येते की तक्रारी कडे दुर्लक्ष होते हे येत्या काळात कळेल.
गेल्या पाच वर्षापासून या महामार्गाचे बांधकाम अत्यंत धीम्यागतीने सुरू आहे. महामार्ग बांधकामात तारतम्य नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बघ्याची भूमिका घेत आहे. दर्जा सुमार आहे. जुने डांबर जेसीबीने काढून त्याच ठिकाणी दाबण्याचा प्रकार अनेक ठिकाणी घडला. महामार्ग बांधकामात जागोजागी प्रचंड गैरव्यवहार झाला आहे. याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष नाही. आलापल्ली-सिरोंचा या शंभर किलोमीटरच्या मार्गात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट दिसत असताना या कामावर नियुक्त करण्यात आलेले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंते कंत्राटदाराला दर्जा संदर्भात कोणत्याच सूचना देत नाहीत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण निर्माण करताना गैरव्यवहार तर होतच आहे. पण प्रगती ही शून्य आहे. एक सोडले दुसरे पकडले. या पद्धतीने कामात धरसोडचा प्रकार सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला. एक ते दीड वर्षापासून रस्ता खोदून आहे. त्यावर आतापर्यंत गिट्टी टाकण्यात आली नाही. गिट्टी टाकली तर त्यावर मुरूम टाकून दबाई करण्यात आली नाही. डांबर टाकण्यात आले नाही.
या सगळ्या प्रकारा विरोधात भारतीय जनता पक्ष तालुका शाखा सिरोंचाकडून तहसीलदार सिरोंचा यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये करण्यात आलेल्या कामाचा पंचनामा करण्यात आला असून या निवेदनाच्या प्रती केंद्रीय व भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि विधान परिषद सदस्य संदीप जोशी यांच्याकडे रवाना करण्यात आल्या आहेत.
केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे. सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आलेल्या तक्रारी व निवेदने लवकर निकालात निघत असतात. भाजप तालुका शाखा सिरोंचाकडून निवेदन देण्यात आले असल्याने केंद्र सरकारकडून या महामार्गाची दखल लवकर घेण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

