प्रतिनिधी
अहेरी : जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीची इमारत कन्नेपल्ली-खमनचेरू रस्त्यावर आहे. दिशेकडे लक्ष दिले तर पतसंस्थेची इमारत अहेरीच्या उत्तर दिशेला आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने पतसंस्था निवडणुकीच्या वातावरणाला भेट दिली असता प्रचंड स्पर्धा दिसली. दोन्ही पॅनलने पतसंस्थेपासून काही अंतरावर आपले मंडप उभारले. समर्थक मंडपात तर एक -एक इंच जागा लढवित उमेदवार हॉकी ग्राउंड पर्यंत पोहोचले आहेत.
उत्तुंग आमुची उत्तर सीमा
इंच इंच लढूवू……
प्रसिद्ध कवी वसंत बापट यांच्या या ओळी आहेत. कवितेच्या या ओळीची आज उत्तर सीमेवर प्रचिती दिसली.
पतसंस्थेच्या निवडणुकीत स्पर्धा होण्याची चिन्हे आधीच दिसायला लागली होती. दोनच पॅनल असल्यामुळे जोखीम स्वीकारायची नाही हेच धोरण दोन्ही पॅनलने स्वीकारले. मतदानाला आठ वाजता पासून सुरुवात झाली. दानशूर चौकातून पतसंस्थेकडे जाताना पहिला मंडप समता पॅनल चा आहे. दुसरा मंडप सोसायटी पॅनलचा आहे. मतदारांचे ‘दर्शन’ आधी आपल्याला झाले पाहिजे. मतदारांना नमस्कार करणे अत्यावश्यक आहे. आज तोच राजा आहे. म्हणून सुरुवातीला काही उमेदवारांनी साई मंदिराजवळ येऊन मतदारांना नमस्कार करायला सुरुवात केली. ही बाब दुसऱ्यांना कळली. पुढे 100 ते 150 मिटर अंतरावर त्यांनी आपल्या खुर्च्या टाकल्या. उमेदवारांना उभे केले. एका पॅनलचे समर्थक आणि उमेदवार त्याच्यापुढे पोहोचले.त्यांनी हॉकी ग्राउंड समोर दुचाकी उभ्या केल्या. आणि मतदारांना नमस्कार करायला सुरुवात केली.
परक्यांचा येता हल्ला….
प्रत्येक व्यक्ती बने किल्ला…..
केवळ उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात नाही तर समर्थकांसाठी सुद्धा प्रतिष्ठेची बाब झाली आहे. समर्थकही निवडणुकीच्या या प्रक्रियेत आपले योगदान देऊन किल्ला लढवित असताना दिसत आहे.

