भामरागड : भामरागड-नेलगुंडा रस्त्यावर भामरागड पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या जुव्वी या गावचे रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक पुसु गीबा पुंगाटी वय 60 वर्ष यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. हत्येनंतर पुसु पुंगाटी यांच्या मृतदेहाजवळ कोणतेही पत्रक टाकण्यात आले नसले तरी करण्यात आलेली हत्या नक्षलवाद्यांनीच केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुसू गिबा पुंगाटी हे जुव्ही येथील रहिवासी होते.पंचक्रोशीत सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते प्रसिद्ध होते. आदीम समाजामध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. त्यांच्या हत्येने भामरागड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्लीचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. चिन्ना पुंगाटी व अहेरी येथे वकिलीचा व्यवसाय करणारे अॅड. किशोर पुंगाटी यांचे पुसू गिबा पुंगाटी हे वडील आहेत. भामरागड तालुक्याच्या समाजकारणात व राजकारणात सक्रिय असलेले एड. लालसू नगोटी यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत.
काल रात्री 11.30 च्या सुमारास साध्या वैशात दोन युवक त्यांच्या जुवी घरी आले. घरून त्यांना बाहेर जंगलात घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी गावाजवळच त्यांचा मृतदेह आढळला. करण्यात आलेली हत्या नक्षलवाद्यांकडूनच करण्यात आली असावी असा स्पष्ट अंदाज दिसत आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेले पुसू पुंगाटी हे पोलिसांचे खबरे नसल्याचा खुलासा पोलीस विभागाकडून करण्यात आला आहे. पुसू पुंगाटी वयोवृद्ध असल्याने समाजाच्या कामात नेहमीच सक्रिय असायचे. भामरागड व परिसरात सामाजिक कार्यानिमित्ताने फिरायचे. करण्यात आलेल्या हत्येबाबत नक्षलवाद्यांकडून कोणतीही स्पष्टीकरण देण्यात आले नसले तरी हत्या नक्षलवाद्यांकडूनच झाली असावी हा अंदाज बांधण्यात येत आहे.
पुसू पुंगाटी यांच्या हत्येचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यांच्या हत्येचे कारण लवकरच उघडकीस येणार आहे.
