नगरसेविका रामेश्वरी मुक्कावार यांची मागणी.
भामरागड ता.१३- येथील नगरपंचायतमध्ये नगराध्यक्षांच्या पतीचा विकास कामांत होणारा हस्तक्षेप त्वरित थांबवून आतापर्यंत झालेल्या विकास कामांची चौकशी करावी.अशा आशयाचे निवेदन भामरागड नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक १२ च्या नगरसेविका सौ.रामेश्वरी सचिन मुक्कावार यांनी मुख्याधिकारी यांना दिले.
निवेदनात असे म्हटले आहे,की नगरपंचायत भामरागडच्या नगराध्यक्षा यांचे पती नेहमी नगरपंचायत कार्यालयातच असतात. तसेच होणाऱ्या विकास कामांमध्ये नेहमी हस्तक्षेप करतात.एका वार्डातील कामे दुसऱ्या वार्डामध्ये करण्यास भाग पाडतात.सभेमध्ये विकासकामांबद्दल नगराध्यक्षांना काही विचारल्यास त्या काहीही बोलत नाही किंवा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही.हे सगळे त्यांच्या पतीच्या सांगण्यावरून होत आहे.नगरसेविकेंनी विचारलेल्या प्रश्नांवर मौन बाळगायचा असा दम माझ्यासमोर नगराध्यक्षांना त्यांच्या पतीने दिला.या हस्तक्षेपांबद्दल मी नगराध्यक्षांशी बोलते,तेव्हा त्यांचे पती माझ्याशी भांडतात.
तद्वतच नगरपंचायतीच्या १७ वार्डांपैकी किती वार्डांमध्ये कोणती विकास कामे झालीत? त्यांवर खर्च किती झाला? कामाचा दर्जा कसा आहे? इत्यादींची चौकशी होणे गरजेचे आहे.फक्त नगराध्यक्षांच्या वार्डातीलच कामे न करता,इतरही वार्डातील विकास कामे करावेत.नगराध्यक्षांच्या वार्डातील मंजूर कामे किती व झालेत किती? याचीही चौकशी करून अतिरिक्त झालेल्या कामांची रक्कम वसूल करावी.अशी मागणीही नगरसेविका रामेश्वरी सचिन मुक्कावार यांनी केली आहे.एकंदरीत नगराध्यक्षांच्या पतीचा नगरपंचायतमध्ये होणारा हस्तक्षेप त्वरित थांबवून आतापर्यंत झालेल्या विकास कामांची चौकशी करण्याचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले असून त्यांची प्रतिलीपी जिल्हाधिकारी, गडचिरोली, नगरविकासमंत्री, मुंबई, विधानसभा सदस्य, अहेरी विधानसभा क्षेत्र, यांना दिली आहे.

