एटापल्ली : दिनांक 12 मार्च 2025 ला सेमल लाकडाची तस्करी करणारा ट्रक पकडल्या जातो. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय एटापल्लीकडे ट्रक आणत असताना वाटेत बिघाड निर्माण होते. ट्रक नादुरुस्त होतो. ट्रक जागेवरच सोडल्या जाते. नजीकच्या पिपली बुर्गी या सोयीस्कर गावी वनविभागाचे कर्मचारी मुक्काम करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रक कडे जातात. तेव्हा ट्रक घटनास्थळावरून गायब असतो. प्रकार आश्चर्यजनक वाटते. सिनेमाच्या कथेसारखे वाटत आहे. वन विभागाकडून सेमल लाकडाच्या जप्तीचे या पद्धतीने वर्णन केल्या जात असले तरी सामान्य माणूस मात्र या वर्णनावर विश्वास ठेवायला तयार नाही.
ट्रक निश्चित पकडला. ट्रक ओरिजनलच आहे. डुप्लिकेट नाही. पण या पद्धतीने पकडला नसावा अशी चर्चा एटापल्ली येथे आहे.
12 मार्च 2025 ला वन विभागाने ट्रक जप्त केला. ट्रक धारकाकडून वाहतूक परवाना व सेमल लाकडाच्या खरेदीची पावती मागितली असता त्याच्याकडे काहीच नव्हते. अर्थात ट्रकमध्ये असलेले सेमल लाकूड अवैद्य होते. जिजावंडी या गावात हा प्रकार घडला. जिजावंडी ते एटापल्ली हे अंतर 40 किलोमीटरचे आहे. जीजावंडी हे गाव वनपरिक्षेत्र कार्यालय एटापल्ली अंतर्गत येते. ट्रकला एटापल्ली येथे आणणे आवश्यक होते. सुस्थितीत असलेला ट्रक अचानक बिघडतो. जिजावंडी गाव पाचशे लोकवस्तीचे आहे. छत्तीसगडचे मध्यम गाव येथून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. आरोपी तिथे जातात. मेकॅनिक घेऊन येतात. शंभर टक्के अंदाज लावून खराब ट्रकचे स्पेअर पार्ट सुद्धा आणले जातात. लाकडं भरलेला ट्रक रात्र भरात सहजपणे दुरुस्त होतो. आरोपी ट्रक घेऊन छत्तीसगडच्या पाखांजूरकडे निघूनही जातात. सगळं काही कपोलकल्पित वाटत आहे.
ट्रक जप्तीची वस्तुस्थिती वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सेमल लाकडाचा ट्रक पकडला ही बाब खरी आहे. पण कहानी मात्र ‘औरच’ आहे. अशी चर्चा आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून काहीतरी चूक झाली असावी. सेमल लाकडाची तस्करी करणारे पळून गेले असावेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना शोधले. शेवटी काही ना काही कथानक तयार करावे लागेल. वनविभागाने एक ‘परफेक्ट स्टोरी’ लिहिली. ती सादर केली अशी शंका बळावत आहे.

