अवैद्य लाकडाचा ट्रक जप्त
आरोपी फरार
एटापल्ली : महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या जीजावंडी या गावातून सोळा चाकाच्या ट्रक मध्ये सेमल प्रजातीचे लाकूड अवैद्यरित्या छत्तीसगडमध्ये नेत असताना ट्रकच पकडण्यात आला. या प्रकाराने वनविभागामध्ये खळबळ माजली असून महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सागवान, सेमल व इतर प्रजातीच्या लाकडांची तस्करी होत असावी या शंकेला बळ मिळत आहे.
वनविभागाकडून सेमल लाकडाच्या तस्करीशी संबंधित असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधाने चार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. दोघे छत्तीसगडचे तर दोघे महाराष्ट्रातील आहेत. चारही आरोपी फरार आहेत. फरार आरोपींना पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न केल्या जात आहे.
जिजावंडी हे गाव महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर आहे. हाकेच्या अंतरावर छत्तीसगड आहे. जिजावंडी व परिसरातील लोकांचा दैनंदिन संबंध छत्तीसगडशी असतो. गावकऱ्यांचा यात सहभाग असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे.हा विषय सुद्धा वन विभागाकडून तपासात ठेवण्यात आला आहे.
वृत्त असे की दि. 12 मार्च 2025 ला प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वनविभागाचे एक पथक जिजावंडी येथे ट्रकच्या मागावर होते. ट्रक दिसताच वन विभागाने लाकूड खरेदी व वाहतूक परवाना मागितला असता दोन्ही परवाने नव्हते. ट्रक जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालय एटापलीकडे आणत असताना गावाच्या जवळपासच ट्रकमध्ये बिघाड निर्माण झाला. ट्रक सुरू होत नव्हता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ट्रक जागेवर सोडून पिपली बुर्गी येथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा गेले असता ट्रक घटनास्थळावरून गायब असल्याचे लक्षात आले. चौकशी केली असता 60 ते 70 जणांच्या टोळक्याने ट्रक छत्तीसगड कडे नेल्याची माहिती मिळाली. अतिरिक्त फौजफाटा घेऊन वनविभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ट्रकचा माग काढला. ट्रक छत्तीसगडच्या पाखंजूर येथे असल्याचे समजले. तेथे जाऊन ट्रक जप्त करण्यात आला. आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय येथे आणण्यात आला. या प्रकरणात मिहीर निमाई विश्वास, अनादी मिस्त्री रा. पाखंजुर, शांती दत्ता, बप्पी दत्ता रा. विकासपल्ली या चार आरोपींचा समावेश असल्याचे लक्षात आले. या चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे चारही आरोपी फरार आहेत. एटापल्लीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी नीलिमा खोब्रागडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सेमल प्रजातीचे लाकूड व ट्रक जप्त करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

