प्रतिनिधी
अहेरी : वनपरिक्षेत्र कार्यालय एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या जिजावंडी येथून सेमल लाकडाची तस्करी करणाऱ्या मिहीर निमाई दत्ता रा. पाखंजूर याला एक दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली.
आज दुपारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.एम.एच. शाहिद यांच्यापुढे उपस्थित करण्यात आल्यानंतर त्यांनी ही कोठडी सुनावली. मिहीर दत्ता याच्या वतीने एड. उदयप्रकाश गलबले यांनी बाजू मांडली. वनविभागाच्या वतीने सरकारी वकील एड. उंदीरवाडे यांनी बाजू मांडली.
जिजावंडी व परिसरात सेमल उर्फ सावरीचे लाकूड मोठ्या प्रमाणात आहे.
सेमल या लाकडाचा प्लायवूड तयार करण्यासाठी वापर होतो. या प्रजातीचे लाकूड मऊ असते. सेमल लाकडाने भरलेला ट्रक विनापरवाना जात असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने जिजावंडी येथे पकडला. त्यानंतर या ट्रकच्या अपहरणाचे नाट्य घडले.
तस्करी प्रकरणात एकूण चार आरोपींचा समावेश आहे. एक आरोपी मिहीर निमाइ दत्ता याला दिनांक 19 मार्च 2025 ला ताब्यात घेण्यात आले.
21 मार्च 2025 ला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अहेरी यांच्यापुढे उपस्थित करण्यात आले असता वनविभागाकडून ऍड.उंदीरवाडे यांनी सात दिवसाची वन कोठडी मागितली. सात दिवसाच्या वनकोठडी चा एड. उदय प्रकाश गलबले यांनी विरोध केला. 20 मार्च 2025 ला मिहीर दत्ता वनविभागाच्या ताब्यात होता.अर्थात वन विभागाने त्याची चौकशी केली. सागवानासारख्या मौल्यवान लाकडाच्या तस्करी सारखी सेमल लाकडाची तस्करी नाही. यामुळे यात वनविभागाला फारशी चौकशी करण्याची गरज नाही. असे सांगत सात दिवसाच्या वने कोठडीचा विरोध केला. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.एम.एच. शाहीद यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत एक दिवसाची वनकोठडी मंजूर केली. उद्या पुन्हा मिहीर दत्ता याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अहेरी यांच्यापुढे उपस्थित करण्यात येणार आहे.

