प्रतिनिधी
भामरागड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुक्कामेटा येथील प्राथमिक मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दि. 05 मार्च 2025 ला विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची तक्रार पोलीस स्टेशन लाहेरी येथे करण्यात आली आहे. कुक्कामेटाचे प्राथमिक मुख्याध्यापक रविंद्र गव्हारे यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार विद्यार्थिनींच्या पालकांनी केली.
दृक-श्राव्य प्रणालीद्वारे आज रवींद्र गव्हारे यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शितरे यांच्यापुढे उपस्थित करण्यात आले. यात त्यांनी पाच दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली.
विद्यार्थिनींना वेगवेगळ्या बहाण्याने बोलावून त्यांच्याशी गंभीर असे गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. विद्यार्थीनी अल्पवयीन असल्याने पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच विद्यार्थिनी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील असल्याने गव्हारेवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून गव्हारे यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शीतरे यांच्यासमोर उपस्थित केले असता पोलिसांनी दहा दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. गव्हारेच्या वतीने एड. उदयप्रकाश गलबले यांनी युक्तिवाद केला. त्यांनी दहा दिवसाच्या पोलीस कोठडीला विरोध केला. गव्हारेकडून कुठलीही वस्तू हस्तगत करावयाची नसल्याने दहा दिवसाच्या पोलीस कोठडीची गरज नाही असे सांगितले. पोलिसांच्या वतीने सरकारी अधिवक्ता एड.भांडेकर यांनी पोलिसांची बाजू मांडली.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शीतरे यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गव्हारे यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाचा तपास भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी मोहिते यांच्याकडे आहे. ते या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
