प्रतिनिधी
एटापल्ली :- एटापल्ली येथून जिवनगट्टा येथे जात असताना एका दुचाकी स्वाराने ट्रॅक्टरला धडक दिली यात तो गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती होताच केंद्रीय राज्य राखीव पोलीस बल एटापल्ली कडून त्याला तात्काळ मदत करण्यात आली. केंद्रीय राज्य राखीव पोलीस बल एटापल्लीकडून करण्यात आलेल्या मदतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
एटापल्ली येथून एक युवक दुचाकीने नजीकच्या जीवनगट्टा या गावी जात होता. रस्त्यात असलेल्या एका ट्रॅक्टरला त्याच्या दुचाकीची धडक बसली. धडक जोरदार स्वरूपाची असल्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत तो रस्त्यात पडून होता. या संदर्भातली माहिती केंद्रीय राज्य राखीव पोलीस बल क्रमांक 191 एटापल्लीला मिळताच केंद्रीय राखीव पोलीस बलाकडे असलेली रुग्णवाहिका मदतीसाठी तात्काळ पाठविली. रुग्णवाहिकेने जखमी युवकास ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सदर युवकास जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संदर्भांकित करण्यात आले. तेव्हा रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. पुन्हा पुढील प्रवासासाठी केंद्रीय राखीव पोलीस बलाची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. जखमी युवकाला गडचिरोली येथे पाठवण्यात आले. विपरीत परिस्थितीत विलंब न करता रुग्णवाहिका उपलब्ध करून जखमी युवकाची मदत केल्याबद्दल केंद्रीय राखीव पोलीस बलाची प्रशंसा करण्यात येत आहे. यात केंद्रीय राखीव पोलीस बलाचे सत्यप्रकाश, निरीक्षक सत्यपाल अग्रवाल, कर्मचारी वसंता वाळीवे, राकेश मडामें यांनी सहकार्य केले..
