अहेरी :
अरे संसार संसार!
जसा तवा चुल्यावर!
आधी हाताला चटके!
मग मिळते भाकर!!
प्रसिद्ध कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या ह्या ओळी आहेत.
स्वयंपाक घरात काम करीत असताना हाताला चटके बसल्याशिवाय स्वयंपाक हातात येत नाही. हा याचा अर्थ आहे. जेवणाचे तयार ताट प्रत्येकांपुढे येत असते. असे असले तरी ताटात असलेल्या खाद्यपदार्थांविषयी प्रत्येकांना आकर्षण असते. प्रतिक्रिया व्यक्त होत असतात. खाद्यपदार्थ कसा तयार झाला हे जाणून घेण्याची प्रत्येकांची ओढ असते. बालवयात जास्तच असते. लहान मुले याविषयी आपल्या आईकडे कुतूहलाने चौकशी करत असतात. स्वयंपाक करीत असताना बारकाईने निरीक्षण करतात.
मुलांना जोखीम पत्करावी लागू नये म्हणून आई-वडील त्यांना स्वयंपाक करू देत नाही किंवा त्या प्रक्रियेत समाविष्ट करत नाही. पण स्वयंपाकाच्या प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांना प्रचंड आकर्षण असते. कुठला पदार्थ कसा बनतो हे त्यांना जाणून घ्यायचे असते. विद्यार्थ्यांची ही मानसिकता शिक्षक मंडळी अचूकपणे हेरतात. विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गडअहेरी येथे करण्यात आला
मुख्याध्यापक संजय कोंकमुटीवार, सहाय्यक शिक्षिका मंजुषा नैताम, कंत्राटी कर्मचारी मंगला मराठे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी विविध पकवान बनवले. पक्वानाचा आस्वाद घेतला. आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य तरळले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडअहेरी येथे एकूण 35 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना चार गटांमध्ये विभाजित करण्यात आले. सोनाक्षी मेश्राम, प्रविणा गेडाम, अवनी आत्राम, सुजल पुपलवार या चार विद्यार्थिनींना गटप्रमुख बनवण्यात आले. अन्य विद्यार्थ्यांनी या गटप्रमुखांना सहकार्य केले. मुख्याध्यापक आणि कर्मचारी सोबतीला होतेच. स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य विद्यार्थ्यांनीच निवडले. खाद्यपदार्थाचा बेत विद्यार्थ्यांनीच आखला. तरबेज स्वयंपाक्यासारखे सगळे साहित्य तयार केले. गटागटाने प्रत्येकांनी स्वयंपाक तयार केला. यात भात, आलू-वांग्याची भाजी, दालफ्राय, पोळी, पुरी, बेसन, टमाटरची चटणी इत्यादी पदार्थ लीलया बनविले. पदार्थ बनवून झाल्यानंतर विद्यार्थ्यासहित सगळ्यांनीच खाद्यपदार्थावर ताव मारला. विद्यार्थ्यांकडून बनवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचा स्वाद घेण्याचा अविस्मरणीय आनंद शिक्षक व कर्मचाऱ्यांना मिळाला. अतिशय उत्कृष्ट असा हा स्वयंपाक चाखायला मिळाल्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
